मुंबई : मुंबईत १३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला सुरक्षा कवच देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या उद्घाटन समारंभापासून दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या महाराष्ट्र नाइट कार्यक्रमासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.वांद्रे-कुर्ला संकुलातील भव्य मैदानावर होणाऱ्या सोहळ्यासह आठवडाभर असणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबई पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकारचे आयोजन हे भारतात प्रथमच होत आहे. या सप्ताहात अंदाजे ३० देशांचे प्रतिनिधी व सुमारे २ हजार विविध औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आठवडाभर चालणाऱ्या मेक इन इंडिया कार्यक्रमासाठी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त केल्याचे पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. गिरगाव चौपाटीवर रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र नाइट कार्यक्रमासाठीही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, त्याची जबाबदारी कुलाबा आणि डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यांवर सोपविली आहे. कुलाबा परिसरात २ सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षकांसह ७ पोलीस निरीक्षक, २५ पोलीस अधिकारी आणि ३२० पोलीस अंमलदारांसह शीघ्र कृती दलाची २ पथके, राज्य राखीव बलाच्या २ प्लॅटून आणि कॉम्बॅक्ट व डेल्टाची ३ वाहने तैनात ठेवण्यात आली आहेत. तर डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ५ सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षकांसह २० पोलीस निरीक्षक, ८५ पोलीस अधिकारी आणि ८९८ पोलीस अंमलदारांसह शीघ्र कृती दलाची १० पथके, राज्य राखीव बलाच्या ५ प्लॅटून आणि एक कॉम्बॅक्ट वाहन सज्ज राहणार आहे. (प्रतिनिधी)२ पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली ६ सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ निरीक्षकांसह ३० पोलीस निरीक्षक, ९० पोलीस अधिकारी आणि ६१७ पोलीस अंमलदारांसह शीघ्र कृती दलाची ३ पथके, राज्य राखीव दलाच्या ४ प्लॅटून आणि कॉम्बॅक्ट व डेल्टाची ४ वाहने तैनात ठेवण्यात आली आहेत.
‘मेक इन इंडिया’ला सुरक्षा कवच
By admin | Published: February 11, 2016 3:50 AM