पंकज राऊत,बोईसर- इंडस्ट्रियल इन्फोटेकच्या वतीने आणि तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर असोसिएशन व एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून दि. ४ ते ६ मार्च दरम्यान तारापूर एमआयडीसी मधील टीमा ग्राऊंडवर भव्य सेफ्टी, सेक्युरिटी व एन्व्हायरोकंट्रोल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून त्याचा मीडिया पार्टनर लोकमत आहे. या प्रदर्शनामध्ये पालघर जिल्ह्यातील कामगार सुरक्षा आणि औद्योगिक सुरक्षेची पातळी वाढविण्यासाठी तसेच देशामध्ये व्यवसाय करू इच्छित असणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सहा हजार चौ. मीटर क्षेत्रामध्ये पन्नासपेक्षा अधिक नामांकित कंपन्या या एक्स्पोमध्ये सहभागी होणार असून प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे कामगार सुरक्षा, आॅफिस, फॅक्टरी सुरक्षिततेची उत्पादने, ध्वनी, हवा, पाणी प्रदूषण नियंत्रण करणारी उपकरणे, नवीन तांत्रिक व बिगर तांत्रिक सुरक्षा उपकरणे असतील. सुरक्षिततेबाबतची प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण, चर्चासत्रे, स्पर्धा आणि पुरस्कार इत्यादी भरगच्च कार्यक्र मांचे हे आयोजन करण्यात आले असून सहभागी कंपन्यांमध्ये आग नियंत्रक उपकरणे, सीसी टीव्ही कॅमेरा, डिटेक्शन सिस्टीम, आणि ट्रॅकिंग सिस्टीम, वैयक्तिक सुरक्षितता, रस्ते व औद्योगिक सुरक्षा उपकरणे, सुरक्षा लाइट व मार्गदर्शक चिन्हे, रासायनिक सुरक्षितता, आयटी, पर्यावरण आणि आरोग्य सुरक्षा व सौर ऊर्जा उपकरणे यांचा समावेश असणार आहे. या प्रदर्शनात सुरत, वापी, पुणे, नाशिक, नवी मुंबई, इ . अनेक भागांतून विविध कंपन्या सहभागी होणार असून त्यामध्ये अधुरा अॅक्वा ट्रीट, करम, कल्याणी इंजिनियर्स, वासू केमिकल्स , प्रोलाइट आॅटोग्लो लिमिटेड, एसव्ही मशीन टूल्स, साई ट्रीट, नॅशनल फायर, कालीन लॅबोरेटरीज, सीपीपल्स, इसेट अँटीव्हायरस, श्री कॉम्प्यूटर सर्व्हिसेस, सारख्या मोठ्या कंपन्या आहेत. तसेच एस इ ई चेंबर आॅफ इंडिया, टीम, पालघर मॅन्युफॅक्चर असोसिएशन, यांचे सहकार्य मिळत आहे. धूळ मुक्त पर्यावरण, पॉवर बॅकअप, अॅल्युमिनियम तंबू, कॅटरींग, प्रथमोपचार सुविधा, वायफाय इंटरनेट सुविधा, सी सी टीव्ही सरव्हायलन्स, आग प्रतिबंधक, सुरक्षा रक्षक इ. सेवा आयोजकांनाकडून पुरविण्यात येतील. आपल्या उत्पादन व सेवांची जाहिरातही कंपन्यांना डिरेक्टरीमध्ये करता येणार आहे. कॉन्फरन्स हॉल, ओपन स्टेज व प्रात्यक्षिक मैदानाची सुविधा पुरविण्यात येणार आहे. >पाच हजार निमंत्रणेआउटडोअर जाहीरात, ई-मेल मार्केंटींग, गुगल, सोशल मीडिया मार्केटिंग, इनव्हीटेशन कार्डस्, स्टीकर्स, पोस्टर्स इ. चा प्रचारकरिता वापर केला आहे तर सुमारे पाच हजार व्यापारी व उद्योगांना आमंत्रित केले आहे. स्टॉल बुकिंग चालू आहे.त्यासाठी आयोजकांशी संपर्क साधावा असे आवाहन आहे.
तारापूरला मार्चमध्ये सेफ्टी एक्स्पो
By admin | Published: February 28, 2017 2:56 AM