अंबरनाथ : भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या ‘विक्रांत’ युद्धनौकेचे रक्षण अंबरनाथचे ‘कवच’ करणार आहे. कवच ही अँटिमिसाईल सिस्टीम असून ती विक्रांत युद्धनौकेचे मिसाईल हल्ल्यापासून रक्षण करणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी ही अँटिमिसाईल सिस्टीम तयार करण्यात आली आहे.
देशावर सागरी मार्गाने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी आणि तितक्याच ताकदीने परतवून लावण्यासाठी विक्रांत ही युद्धनौका २ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. ही युद्धनौका देशाचे रक्षण करत असली, तरी या युद्धनौकेचे संरक्षणही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शत्रू सैन्याने या युद्धनौकेवर एखादे मिसाईल डागले, तर त्यापासून रक्षण करण्यासाठी या युद्धनौकेवर कवच ही अँटिमिसाईल सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्यावेळी शत्रूकडून विक्रांतवर एखादे मिसाईल डागण्यात येईल, त्यावेळी रडारच्या माध्यमातून कवचला सूचना जाऊन आपोआप त्यातून एक मिसाईल फायर होईल.
ही मिसाईल ‘विक्रांत’पासून ३ ते ५ किमी अंतरावर शत्रूच्या मिसाईलसमोर एक युद्धनौका उभी असल्याचा आभास निर्माण करेल. ज्यामुळे शत्रूची मिसाईल तिथेच फुटेल आणि विक्रांतचे संरक्षण होईल. विक्रांतवर चार ठिकाणी बसवलेली ही संपूर्ण सिस्टीम संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत (एमटीपीएफ) तयार करण्यात आली आहे. त्यामुळे देशाचा अभिमान असलेल्या विक्रांतला अंबरनाथचे सुरक्षा कवच असणे ही अंबरनाथकरांसाठी मोठी गौरवाची बाब ठरली आहे. मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीचे प्रमुख, चीफ जनरल मॅनेजर राजेश अगरवाल यांनीही आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे.
विविध नाैकांवर सिस्टीम कार्यान्वित२००६ पासून या फॅक्टरीत ‘कवच’ या अँटिमिसाईल सिस्टीमची निर्मिती सुरू झाली. ही सिस्टीम संपूर्ण ‘एमटीपीएफ’ फॅक्टरीच्या अधिकारी आणि कामगारांनी मिळून तयार केली आहे. परदेशी तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केलेला नाही. आतापर्यंत अशा १३ ‘कवच’ अँटिमिसाईल सिस्टीम भारतीय नौदलाच्या विविध युद्धनौकांवर बसवण्यात आल्या आहेत.