निगडी : आषाढी वारीसाठी मार्गस्थ झालेल्या संतांच्या पालखी सोहळ्याने शहर व परिसरात भक्तिमय वातावरण झाले आहे. आषाढी वारीचा हा सोहळा आनंददायी व्हावा, या उद्देशाने वाहतूक व्यवस्थापन, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. तसेच होमगार्ड अन्य पोलीस फोर्स तैनात ठेवण्यात आली आहे. भुरट्या चोऱ्यांचा वारकऱ्यांना त्रास होऊ नये, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी पालखी मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी, दुपारची विश्रांती आणि रात्री मुक्काम अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. श्रीक्षेत्र देहू येथून मार्गस्थ झालेली संत तुकोबांची पालखी पहिल्या मुक्कामासाठी मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. त्या ठिकाणी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. तसेच परिमंडल तीन पोलीस उपायुक्त कार्यालयांतर्गतच्या पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी पालखी मार्गावर तैनात होते. पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, तसेच अन्य पोलीस अधिकारी स्वत: हजर होते. वाहतूक पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीवर ताण येऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात तात्पुरते बदल केले होते. आकुर्डी-विठ्ठलवाडीत पालखी विसावणार असल्याने महापालिकेने वीज, पाणी आणि रुग्णवाहिका अशा सुविधा आहेत.(प्रतिनिधी)पर्यायी मार्गाने वाहनांना सोडण्यात आल्याने पालखी मार्गावर वाहनांची वर्दळ नव्हती. पालखी सोहळ्याच्या स्वागतावेळी भक्तीशक्ती चौकात गर्दी झाली. मात्र पोलीस यंत्रणेने योग्य प्रकारे नियोजन केले असल्याने कसलाही गोंधळ उडाला नाही. सुमारे अडीचशे पोलीस पालखी मार्गावर कर्तव्य बजावत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस मित्र संघटनेच्या स्वयंसेवकांचीी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी, वाहतूक नियोजनासाठी मदत घेतली जात आहे.
सुरक्षिततेच्या नियोजनाची वारी
By admin | Published: June 29, 2016 1:29 AM