जमीर काझी / मुंबईसेना-भाजपातील आरोप-प्रत्यारोपामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतील मतदारांचा कौल मंगळवारी मशिनमध्ये बंद झाल्यानंतर सत्तेच्या दावेदारीबाबत विविध अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. राजकीय तज्ज्ञांबरोबरच सट्टेबाजाराच्या दुनियेतही संभाव्य निकालाबाबत मोठी उत्कंठा लागली असून त्यावर तब्बल दोन हजार कोटींचा डाव खेळला जात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत स्पष्ट बहुमत कोणत्याही एका पक्षाला मिळणार नसले तरी बेटिंगवाल्यांनी सत्ताधारी शिवसेनेलाच सर्वात मोठा पक्ष म्हणून पसंती दिली आहे. सर्वाधिक ८५ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तविला जात असून त्यांना एक रुपयाला ३५ पैशांचा भाव देण्यात आला आहे. तर बहुमत मिळविण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला ६५ जागांची शक्यता दाखवण्यात आली असून त्यांच्या बहुमतावरील सट्ट्यासाठी एक रुपयाला तब्बल ४ रुपये १० पैसे इतका दर देण्यात आला आहे. राज्यात व केंद्रात एकत्र सत्तेत असलेल्या या नेत्यांच्या जुगलबंदीमुळे पूर्ण देशाचे लक्ष महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. त्यामुळेच त्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला गेला आहे. विशेषत: रविवारी प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बेटिंग घेतले जात आहे. त्यामध्ये सेनेलाच सर्वाधिक पसंती दर्शविण्यात आली आहे. त्यांच्या ८५ च्या आसपास जागा येतील, तर त्यापाठोपाठ भाजपा हा ६५ जागा मिळवून दोन नंबरच्या जागा पटकावेल, असा कयास आहे. त्यासाठी एक रुपयामागे अनुक्रमे ३५ पैसे व १.१० पैसे भाव देण्यात आला असल्याचे या व्यवहारातील माहीतगाराकडून सांगण्यात आले. भाजपाला बहुमत मिळण्यावर रुपयामागे तब्बल ४ रुपये १० पैसे इतका दर देण्यात आला आहे, तर शिवसेनेला दोन रुपये वीस पैसे इतका भाव आहे. कॉँग्रेस गेल्या वेळेहून कमी म्हणजे जेमतेम ४५ जागा जिंकण्याचा अंदाज दर्शविण्यात आला असून त्यासाठी १ रुपया २० पैसे इतका दर आहे. राज ठाकरे यांच्या इंजिनाचे डबे आणखी घसरले असून त्यांचे जेमतेम १२ नगरसेवक येतील, असा अंदाज आहे. मनसेच्या उमेदवाराला एक रुपयामागे दीड रुपया इतका दर आहे.बेटिंगचा भावपक्ष दरजागाशिवसेना- ३४ पैसे,८५भाजपा- १.१०६५कॉँग्रेस- १.२०४५ राष्ट्रवादी- १.३०१८मनसे- १.५०१२
सट्टेबाजारात भगवाच फेव्हरिट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 4:41 AM