मुंबई : गेल्या ३५० वर्षांत प्रथमच राज्यातील ३०० गड-किल्ल्यांवर एकाच दिवशी भगवा ध्वज फडकवण्याची किमया घडणार आहे. ३० मार्चला ‘स्वराज्य सिद्धी संकल्प दिवस’ म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानने ही मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी सुमारे ३ हजारांहून अधिक कार्यकर्ते तयारी करीत आहेत.याआधी ३० मार्च १६४५ रोजी रोहिडेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यानंतर छत्रपतींनी प्रतिकूल परिस्थितीत रयतेचे राज्य स्थापन केले. त्याच शुभ दिवसाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठानने ३०० किल्ल्यांवर स्वराज्याची पताका व स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प केल्याचे प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख गणेश रघुवीर यांनी सांगितले.रघुवीर यांनी सांगितले की, प्रत्येक किल्ल्यावर भगवी पताका फडकविण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभाग, केंद्र पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि संबंधित सनदा तत्त्वावर दिलेल्या मान्यवरांच्या अधिकृत परवानग्या घेण्यात आल्या आहेत. राज्य पुरातत्त्व विभागांतर्गत ४६ आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागांतर्गत ३८ किल्ले येत असून, उरलेले बहुतांश किल्ले वनविभागांतर्गत येतात. किल्ल्यांवर स्वच्छता मोहीमही राबवली जाईल. त्यात गडावरील प्लॅस्टिक कचरा (बाटल्या), पाला-पाचोळा, काचेचे तुकडे गोळा केले जातील. यावेळी वृक्षतोड तसेच ऐतिहासिक वास्तूला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल.मोहीम म्हणजे पिकनिक नव्हेकोणत्याही किल्ल्यावर अतिउत्साहीपणे गैरकृत्य केल्यास किंवा सूचनांचे पालन न केल्यास त्याला मोहिमेतून बाहेर काढले जाईल. कारण अतिउत्साहामुळे अपघात होण्याची शक्यता बळावते. याची दक्षता घेणे ही मोहिमेतील नेतृत्व करणारे व त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सदस्यांची जबाबदारी असेलमोहिमेपूर्वी व मोहिमेत काय करायचे?ज्या किल्ल्यावर आपण जाणार आहोत त्या किल्ल्याचा इतिहास अभ्यासावा व सोबत आलेल्या शिवभक्तांना त्याची माहिती द्यावी.स्वच्छतेसाठी प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशव्या सोबत न्याव्यात व त्यामध्ये गडावरील प्लॅस्टिकचे तुकडे, काचेचे तुकडे, पाला-पाचोळा हे गोळा करावे. शक्य असल्यास झाडूही न्यावा.गडावर आपण स्वराज्य पताका (ध्वज) लावणार आहोत व स्वच्छता मोहीम राबवणार आहोत. स्वराज्य पताका लावत असताना कोणत्याही ऐतिहासिक वस्तूला धक्का न लावता हे कार्य करायचे आहे. त्यासाठी शक्य होईल तसे काठी किंवा बांबू यावर पताका लावावी. (साहित्याची स्वत: व्यवस्था करावी)गडभ्रमंती वेळेनुसार करावी; कारण वेळ वाचवून गडावरील स्वच्छता करणार आहोत.समूहामध्ये एक सदस्य मोहिमेचे नेतृत्व करेल व इतर त्यांना सहकार्य करतील. मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी ही सर्व सदस्यांची असेल.मोहिमेसाठी हजारो कार्यकर्ते सज्जस्वराज्य सिद्धी संकल्प दिवस साजरा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक भागातून कार्यकर्ते सामील होणार आहेत. प्रत्येक किल्ल्यावर सुुमारे ३५ ते ४० कार्यकर्ते मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे सुमारे १० हजारांहून अधिक कार्यकर्ते या उपक्रमात सामील होणार असल्याचे रघुवीर यांनी सांगितले.शिवप्रेमींना आवाहनया दिवसाचे साक्षीदार म्हणून अधिकाधिक व्यक्ती, संस्था, मंडळे, ट्रेकिंग ग्रुप व सर्व इच्छुक शिवप्रेमींनी या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. कमीतकमी ५ लोकांचा एक समूह तयार करून राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर जाण्याचे आवाहन प्रतिष्ठानने दुर्गप्रेमींना केले आहे.
३०० गड-किल्ल्यांवर फडकणार भगवा!
By admin | Published: March 28, 2016 2:55 AM