- नरेंद्र जावरे, परतवाडा (अमरावती)
सागवान तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर तस्करांनी दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल वनकर्मचाऱ्यांनी हवेत दोन राउंड फायर केले. ही घटना शनिवारी दुपारी १.३०च्या सुमारास पूर्व मेळघाट वनविभागाच्या खिरकुंड जंगलात घडली. या दरम्यान एकाला अटक करण्यात आली असून, जवळपास १९ तस्कर पळून गेले.पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरांतर्गत येणाऱ्या अंजनगाव वनपरिक्षेत्राच्या खिरकुंड जंगलात सकाळी १०च्या सुमारास १५ ते २० सागवान तस्कर शिरल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली होती. या तस्करांना रंगेहात पकडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांनी कर्मचारी-मजुरांचे पथक तयार करून तस्करांचा शोध सुरू केला. तेव्हा वनखंड क्रमांक १०३८मध्ये सागवान वृक्षांची कत्तल सुरू असल्याचे आढळले.वनकर्मचाऱ्यांनी तस्करांना पकडण्यासाठी चारही बाजूने घेराव घातला असता, तस्करांनी वनकर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक केली. त्यांना रोखण्यासाठी वनकर्मचारी योगेश सुरत्ने यांनी रायफलमधून हवेत दोन फैरी झाडल्या. परिणामी, तस्करांनी घाबरून पळ काढला. मात्र, एकाला अटक करण्यात वनकर्मचाऱ्यांवर यश आले आहे. सल्लू बापू गवते (३६) असे या तस्कराचे नाव आहे.एका आरोपीस घटनास्थळावरून अटकएका आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. त्याने चौकशीत १९ तस्करांची नावे सांगितली असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे अंजनगाव परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांनी सांगितले.