आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : ध्यास हा जिवाला, पंढरीशी जावू, पंढरीचा राणा डोळे भरुन पाहू या उक्तीप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री विजय देशमुख यांनी माऊलींच्या पादुकाचे पुजन करुन पालखीचे स्वागत केले.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार रामहरी रुपनर, हणमंतराव डोळस, माळशिरसच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी संजीव जाधव, गटविकास अधिकारी सुरेश मारकड, तहसिलदार बाई माने उपस्थित होते.जिल्ह्यात सकाळी ११ वाजता माऊलींच्या पालखीचे आगमन झाले. तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील व जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला निरोप दिला. पालखी सोहळ्यात धर्मपुरी ते डाकबंगला मैदानापर्यंत पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिंडी समवेत पायी चालत प्रवास केला.पालखी आगमनापुर्वी भारुडकार चंदाताई तिवाडी यांनी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविले जाणारे पर्यावरण, निर्मलवारी आणि स्वच्छता विषयक जनजागृतीचे कार्यक्रम सादर केले. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी धर्मपुरी डाक बंगला येथे विसावा घेऊन नातेपुतेकडे जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.
विठू नामाच्या अखंड गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जिल्ह्यात आगमन
By admin | Published: June 28, 2017 5:40 PM