- राजा माने
मुंबई - काही महिन्यांपूर्वी सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरानंतर येथील जनतेच्या मदतीसाठी जीवाची परवा न करता मदतीला धावलेले आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक झाले होते. तेच विश्वजीत कदम आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुरग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे येथील जनता त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर "लोकमत विथ लिडर" या कार्यक्रमांतर्गत त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी विश्वजीत कदम यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच आपल्या वडिलांच्या पुण्याईमुळे आणि मागील सव्वा वर्षात केलेल्या कामामुळे आपल्याला जनतेचा आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
- महापुराची पार्श्वभूमी लाभलेल्या मतदार संघातील विधानसभा निवडणुकीविषयी तुम्हाला काय वाटतं ?कदम : पलूस तालुका मतदासंघातील महत्त्वाचा तालुका आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं येथे महापूर येईल. अनेक गाव महापुरात बुडली होती. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतीचं मोठं नुकसान झालं. येथील जनतेला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. परंतु, आपण महापुराच्या वेळी सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्वत: मदतीसाठी उतरलो. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून डॉक्टरांचे पथक आणि विद्यार्थी तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मदतीला धावले. त्यामुळे मदत करणं शक्य झालं.
- महापुराच्या काळात विश्वजीत कदमांचं प्रतिसरकार मदतीला धावलं अशी भावना लोकांची आहे. हे कसं शक्य झालं ?कदम : मी पुढाकार घेतला, त्यानंतर लोकांची आणि कार्यकर्त्यांची साथ मला मिळाली. इतरांची साथ मिळविण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणे आवश्यक आहे. पहाटे दीड वाजेपर्यंत मी काम केलं. अनेक गावांत गेलो. स्वत: दुपारचे जेवन पुरग्रस्तांसोबत केलं. राज्य सरकार पुरस्थितीच्या काळात झोपलं होतं. त्यामुळे प्रतिसरकार उभं करावं लागलं. ही शोकांतीका असल्याचेही कदम यांनी नमूद केले.
- या निवडणुकीत विजयाचं गणित कसं मांडता ?कदम : आमच्या विजयाचं गणित लोक, कार्यकर्ते मांडत आहेत. खरं सांगायच तर आदरणीय पतंगराव कदम साहेबांच्या कामाच्या पुण्याई व्यतिरिक्त मागील सव्वा वर्षाचा कालावधी मी मतदारसंघातील कामात घालवला. कोणतही काम थांबवलं नाही. महापुरातील कामाच्या वेळी जनतेतून मला फार प्रेम आणि आदर मिळाला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मला या मतदारसंघातून मोठं मताधिक्य येथील जनता देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- आपण प्रदेश कार्याध्यक्ष आहात. पण तुम्ही मतदारसंघात अडकून पडलात. राज्यात कुठेही फिरत नाहीत. अस का घडतयं ?कदम : तसं काही नाही. मी कालच पुरंदर, जत मतदार संघात प्रचारसभा घेतल्या. पुणे शहरातील तीन मतदार संघात सभा घेतल्या. येणाऱ्या दिवसांत सांगली, कवठे महाकाळ मतदार संघात जाणार आहे. परंतु, राज्याच्या दौऱ्यावर जाणे शक्य नाही. पक्ष श्रेष्ठींनी मला स्टार प्रचारक केले आहे. त्यामुळे स्टार प्रचारकाला हेलिकॉप्टर उपलब्ध होतात. परंतु, खराब हवामानामुळे ते शक्य नाही. तसेच प्रत्येक विभागातील काँग्रेस सक्षम आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल नक्कीच चांगला लागेल अशी खात्री कदम यांनी व्यक्त केली.
- राज ठाकरेंना प्रबळ विरोधीपक्ष म्हणून समोर यायचंय. मग काँग्रेसची भूमिका काय ?कदम : राज ठाकरे पक्षाचे नेते आहेत. त्यांना महाराष्ट्रातील विरोधीपक्षांच नेतृत्व करायची इच्छा असेल तर तो त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आता राज्यातील राजकीय समिकरणं बदलत चालली आहेत. एकच पक्ष सर्वकाही करू शकतो, अशी स्थिती नाही. आता इतर पक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊन पुढं जावं लागणार आहे.
पंतगरावजींना तब्बल दोन तप भावी मुख्यमंत्री बिरूद लागले. त्यांनी राज्यात कार्यकर्त्यांच मोहोळ तयार केलं. तुम्ही तसा प्रयत्न कधी सुरू करणार ?कदम : कदम साहेबांना लोकांनी भरभरून प्रेम दिलं. आमच्या साहेबांनी माणस मिळवली. ही पुण्याई महाराष्ट्र पाहतोय. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केलं. राजकारणात शुन्यातून उभारी घेतली. याचं सर्वांना कौतुक आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. मुख्यमंत्रीपद मिळाल नाही तरी ते आनंदी होते. परंतु, पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील जनतेसाठी आणि येथील मातीसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं. ही त्यांच्या मनातील इच्छा होती, असंही कदम म्हणाले. भविष्यकाळ कुणाला ठावूक नसतो. पण मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत राहील.