मुंबई : ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या कथा संग्रहासाठी वर्ष २०१६चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त साहित्यामध्ये ८ काव्यसंग्रह, ७ लघुकथा संग्रह, ५ कादंबऱ्या, २ समीक्षा, १ निबंध यासह १ नाटक यांचा समावेश आहे.नवी दिल्ली येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमी २०१६च्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्यअतिथी भौतिक शास्त्रज्ञ तसेच मराठी लेखक जयंत विष्णु नारळीकर, साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कंबार, सचिव के. श्रीनिवासराव तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मंचावर उपस्थित होते. देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारांत सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या लेखकांनाही या सोहळ्यात पुरस्कृत करण्यात आले. आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ कथासंग्रहासाठी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. ‘आलोक’ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली मांडली आहे. ग्रामीण भागातील जीवनशैलीमध्ये आलेले व्यापक परिवर्तन हे सशक्त तसेच वस्तुनिष्ठरीत्या प्रस्तुत केलेले आहे. लोमटे यांनी मराठी साहित्यात पदव्युत्तर तथा डॉक्टरेट पूर्ण केली आहे. लोमटे यांचे ‘इडा पीडा टळो’, ‘आलोक’ हे कथासंग्रह आणि ‘धूळपेर’ हा लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहेत. लोमटे यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘ग्रंथ गौरव’, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार, भैरव रतन दमानी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी.एल. ठोकळ पुरस्कार, पा.वा. गाडगीळ पुरस्कार आणि मानवी हक्कवार्ता पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. (प्रतिनिधी)
साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
By admin | Published: February 25, 2017 4:52 AM