पुणे : शहरातील सह्याद्री हॉस्पिटल, रूबी हॉस्पिटल, नेस वाडिया हॉस्पिटल या रुग्णालयांच्या विश्वस्तांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.पुणे, मुंबई या शहरांमधील धर्मादाय रुग्णालयांतील गरीब रुग्णांसाठी २० टक्के बेड आरक्षित ठेवणे आवश्यक असताना ते ठेवले जात नाहीत. गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी धर्मादाय रुग्णांलयाकडून टाळाटाळ केली जात असल्याबाबतची लक्षवेधी आमदार अनिल भोसले यांनी बुधवारी मांडली होती. धर्मादाय रुग्णालये गरिबांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असलेले बेड श्रीमंत रुग्णांसाठी उपलब्ध करून देऊन मोठ्या प्रमाणात पैसे कमावीत आहेत. सह्याद्री, रूबी, नेस वाडिया व इतर धर्मादाय रुग्णालयांच्या विश्वस्तांनी यातून बेनामी संपत्ती जमा केली आहे. शासनाकडून त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार आहे, अशी विचारणा अनिल भोसले यांनी केली होती.राज्य शासन तसेच पालिकेकडून धर्मादाय रुग्णालयांना सवलती दिल्या आहेत. त्याबदल्यात त्यांनी गरीब रूग्णांसाठी २० बेड राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या रूग्णालयांकडून गरीब रूग्णांवर उपचार न करता त्यांना हुसकावून लावण्यात येत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. (प्रतिनिधी)
सह्याद्री, नेस वाडिया, रुबीच्या विश्वस्तांची चौकशी करणार
By admin | Published: August 04, 2016 12:52 AM