नागपूर : प्रोफेसर साईबाबा याच्याविरुद्धच्या खटल्याची रोज सुनावणी घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गडचिरोली न्यायालयाला दिले आहेत. साईबाबाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. कनिष्ठ न्यायालयात सर्व आठ वस्तुनिष्ठ पुराव्यांची तपासणी झाल्यानंतर साईबाबाला जामीन देण्याबाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊ शकतो, असे संकेतही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. माओवाद्यांप्रती सहानुभूती दाखविल्याच्या आरोपांवरून महाराष्ट्र पोलिसांनी दिल्ली विद्यापीठातील प्रोफेसर साईबाबा याच्यासह पाच जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे. साईबाबा ९० टक्के विकलांग असून चाकांच्या खुर्चीवर खिळलेला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी २०१४ मध्ये त्याला दिल्लीत अटक केली होती. वैद्यकीय साहाय्यासाठी थोडा काळ मिळालेला जामीन वगळता साईबाबा १६ महिन्यांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. सर्वोच न्यायालयाने प्रोफेसर जी. एन. साईबाबा याला पुरेशा सुविधा पुरविण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले. तथापि, त्याच्या जामिनावर कोणताही आदेश देणे टाळले. तुम्ही (राज्य सरकार) त्याला आराम वाटेल याची तजवीज करावी. तुम्ही त्यास असे एकाकी बंदिवासात ठेवू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. (प्रतिनिधी)
साईबाबाविरुद्धचा खटला; रोज सुनावणीचे निर्देश
By admin | Published: March 01, 2016 3:13 AM