शिर्डी : साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सुफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यांचा हा संदेश जगात पोहोचवावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.साईबाबा संस्थान आयोजित जागतिक साई मंदिर विश्वस्तांच्या परिषदेचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले़ पोस्टाच्या ‘माय स्टॅम्प’चे व संस्थान व्यवस्थापनाच्या वर्षपूर्ती अंकाचे प्रकाशन करण्यात आले़ भाषणाची सुरुवात मराठीत करणाºया उपराष्ट्रपतींनी हिंदी, इंग्रजी, तेलगू व संस्कृत भाषेतून उपस्थितांशी हृदयस्पर्शी संवाद साधला़ वंचित आणि गरजूंची सेवा हीच खरी साई भक्ती व असाहाय्य लोकांविषयी केवळ सहानुभूती न दाखविता त्यांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी प्रार्थना आहे.पूजाविधीत न गुंतता सद्बुद्धी, सदाचार आणि सेवाभावनेने मन:शांती मिळते, असे ते म्हणाले़ साईबाबांचा संदेश प्रेम, वात्सल्य आणि माणसाला एकमेकांच्या हृदयाशी जोडण्याचा आहे. भेदभाव विसरून माणसावर प्रेम केल्यास श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम जीवनात होतो. परिषदेच्या माध्यमातून चांगल्या अनुभवाचे आणि कल्पनांचे आदान-प्रदान करीत भारतीयता आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली.उपराष्ट्रपतींनी काढली ‘लोकमत’ची आठवणउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी शिर्डीत कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला़ त्या वेळी त्यांनी ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीच्या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित होतो, असे आवर्जून सांगितले. दिल्लीतील या गौरवपूर्ण कार्यक्रमातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला़मार्चमध्ये नाइट लॅण्डिंगमार्चमध्ये शिर्डी विमानतळावर नाइट लॅण्डिंग सुविधा सुरू होईल, अशी माहिती जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी दिली़ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी हे वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारे ठिकाण असल्याचे सांगितले.देश-विदेशातील भाविकांचा मेळाविश्वस्तांच्या परिषदेसाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. प्रतिनिधींच्या संख्येत मात्र घट झाली. गेल्या वर्षी देशातील अकराशे व विदेशातील ४४ मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते़ यंदा ही संख्या अनुक्रमे ६५० व १९वर आली आहे़ देश-विदेशात सार्इंचा प्रचार-प्रसार करणाºया चंद्रा भानू सत्पथी गुरुजींनी दोन दिवसांपूर्वी हैदराबादेत परिषद आयोजित केल्याचे सांगण्यात येते़ त्यामुळे संख्येत घट झाल्याची शक्यता आहे़कॅनडा, हाँगकाँग, जपान, मलेशिया, नेदरलँड, श्रीलंका, लंडन व अमेरिकेतून १९ साई मंदिरांचे प्रतिनिधी आले आहेत़ सर्वाधिक ३१७ आंध्र प्रदेशातून, तर चंदीगड, हिमालच प्रदेश, केरळमधून प्रत्येकी एक मंदिर प्रतिनिधी आला आहे़ राज्यातील दीडशे साई मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत़ देशभरात जवळपास आठ हजार तर विदेशात पाचशे साई मंदिरे आहेत़
साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू, उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन, जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 2:42 AM