- प्रमोद आहेर, शिर्डी साईबाबा आणि त्यांचे जीवन चरित्र अवघ्या जगाला सुपरिचित असले, तरी शतकापूर्वी झालेल्या त्यांच्या महानिर्वाणाच्या नोंदीचा कोणताही कागद सरकार दप्तरी आढळत नाही़ जीर्ण झालेले सरकारी दप्तर, त्यातील गहाळ झालेली पाने व कमालीच्या अनास्थेने हा दुर्मीळ व ऐतिहासिक ठेवा सध्यातरी अंधारातच आहे़१५ आॅक्टोबर १९१८ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बाबा पंचत्वात विलीन झाले़ त्यानंतर हिंदू-मुस्लिमांच्या वादात तब्बल छत्तीस तासांनी सध्याच्या बुटीवाड्यात त्यांचा देह कोपरगावचे तहसीलदार व राहात्याचे फौजदार यांच्या उपस्थितीत समाधिस्त करण्यात आला़ब्रिटिश राजवटीतही प्रत्येक व्यक्तीच्या जन्म-मृत्यूची नोंद घेतली जात असे़ साईबाबा संस्थानची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या व साईभक्त असलेल्या राधाकृष्णा आई यांचा साईबाबांच्या निर्वाणापूर्वी २२ नोव्हेंबर १९१६ रोजी मृत्यू झाला़ त्यांच्या मृत्यूची नोंद राहाता तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमला आहे़ मात्र, १९१८ सालच्या अत्यंत जीर्ण झालेल्या दप्तराची केवळ तीन निरूपयोगी पाने शिल्लक आहेत़ शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी कोपरगाव तर राहात्याचे नायब तहसीलदार राहुल कोताडे यांनी राहाता तहसीलमध्ये या नोंदी शोधण्याकरिता ‘लोकमत’ला केलेली मदत निष्फळ ठरली़ बाबांच्या देहाचा पंचनामाही उपलब्ध नाही़ ६ नोव्हेंबर १९६० रोजी संस्थान व्यवस्थापन बरखास्त करण्यात आले, तेव्हा कागदपत्रे नष्ट करण्याच्या प्रयत्नात अनेक महत्त्वाचे दस्तऐवजही नष्ट झाल्याचे बोलले जाते़ साईबाबांच्या काळात शिर्डी कोपरगाव तालुक्यात होते़१९९७ मध्ये कोपरगावच्या विभाजनानंतर ते राहाता तालुक्यात आले़ त्यानंतर बेवारस पडलेले शिर्डीचे दप्तर २०१२ मध्ये राहात्याला आणले गेले़ जातीच्या दाखल्यांकरिता वारंवार झालेल्या हाताळणीने त्याचीही अवस्था बिकट झाली़ माजी आयपीएस अधिकारी चंद्रभानु सतपती साईचरित्राचे अभ्यासक आहेत़ त्यांच्यासह कुणाकडे साईबाबांच्या संदर्भातील दस्तऐवजांच्या नकला मिळतात का? यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे स्वत: प्रयत्न करत आहेत़ सतपती यांच्याकडील साईबाबा ग्रंथालयाच्या प्रती शिर्डीतही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले़पुण्यतिथी उत्सव : साईबाबा संस्थानच्या ९७ व्या साई पुण्यतिथी उत्सवास मंगळवारी सुरुवात झाली. पहाटे साई प्रतिमा व साईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली़ मुंबई येथील द्वारकामाई मंडळाने यंदा सिक्कीम येथील साईमंदिराच्या प्रवेशद्वाराची ६२ फूट लांब व ५२ फूट उंच प्रतिकृती साकारली आहे़ रात्री सव्वानऊला पालखीची मिरवणूक काढण्यात आली़ विजयादशमीला भिक्षा झोळी, आराधना विधी, सीमोल्लंघन व रथ मिरवणूक कार्यक्रम होतील.
साई निर्वाणाच्या नोंदीचे दस्तऐवज सापडेना
By admin | Published: October 22, 2015 1:38 AM