बुलडाणा: गर्भपूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान चाचणी (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत सिंदखेडराजा येथील साई डायग्नोस्टिक सेंटर ६ जून रोजी सेंटर सील करण्यात आले असल्याची माहिती येथील जिल्हा शल्य चिकित्सकांनी गुरुवारी दिली. जालना येथील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या गोपनीय माहितीवरून ६ जून रोजी डॉ. सदानंद बनसोड यांचे साई डायग्नोस्टिक सेंटर सील करण्यात आले. ही कारवाई बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांच्या उपस्थितीत तहसीलदार सिंदखेडराजा व वैद्यकीय अधीक्षकांनी केली. सदर प्रकरणात साक्षीदाराची नातेवाईक असलेल्या गरोदर महिलेच्या पोटातील बाळाची गर्भलिंग तपासणी करून मुलगी असल्याचा ठपका डॉ. बनसोड यांच्यावर ठेवला होता. त्या जबाबाच्या अनुषंगाने जिल्हा चिकित्सकांच्या पथकाने साई डायग्नोस्टिक सेंटरची पाहणी केली. पाहणीत काही अक्षेपार्ह नोंदी आढळल्याने डॉ. बनसोड यांच्या सोनोग्राफी सेंटरवर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत सील करण्यात आले. ही कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व सिंदखेडराजा तहसीलदारांनी एकत्रितरीत्या केली आहे.
दुसरबीड येथील सानप हॉस्पिटलची नोंदणी रद्द
जिल्हय़ात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील डॉ. अलकनंदा सानप यांच्या सानप हॉस्पिटलवर ६ जून रोजी कारवाई करण्यात आली, सदर हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. सन २0१0 मध्येच या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली होती. तसेच प्रथम वर्ग न्यायालय सिंदखेडराजा येथे केसही दाखल करण्यात आली होती. ही सर्व कारवाई व न्यायालयीन कामकाजाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला कळविण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने डॉ. अलकनंदा सानप यांचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे.