प्रमोद आहेर, शिर्डीसाईबाबा संस्थानामध्ये लागू झालेल्या सेवाविनियमाने संस्थान कर्मचाऱ्यांना स्थानिक प्राधिकरण, विधिमंडळ किंवा संसदेची निवडणूक लढवण्यास मज्जाव केला आहे़ त्यामुळे अनेक इच्छुकांचा राजकारणातून पत्ता कट झाला आहे़संस्थानवर राजकीय विश्वस्त मंडळ आल्यानंतर त्यांची मेहरनजर संपादन करण्यासही कर्मचाऱ्यांना अडचणी येणार आहेत़ राजकीय विश्वस्तांनाही राजकारणासाठी कर्मचाऱ्यांचा उघड वापर करता येणार नाही़ कारण यापुढे संस्थानच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य होता येणार नाही. कर्मचारी निवडणुकीत कुणाचाही प्रचार करू शकणार नाहीत. वाहनांवर अथवा निवासस्थानावरही कर्मचाऱ्यांना कोणतेही निवडणूक चिन्ह लावता येणार नाही़ विनियमानुसार संस्थानातील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वतीने कुटुंबीयांना भेटवस्तू स्वीकारता येणार नाही़ यात विनामूल्य परिवहन, भोजन, निवास किंवा इतर आर्थिक लाभ यांचा समावेश आहे़ मात्र जवळच्या नातेवाइकाकडून भेटवस्तू स्वीकारता येईल़ मात्र वस्तू ५ हजार रुपयांच्या पुढील असेल तर कार्यकारी अधिकाऱ्यांना कळवावे लागेल़ एखादी व्यक्ती, संस्था, कंपनी यांच्याकडून पाहुणचार घेणेही टाळावे लागणार आहे़ याशिवाय समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्मचारी पुरस्कारही स्वीकारू शकणार नाही़
साई संस्थान कर्मचा-यांचा राजकारणातून पत्ता कट! भेटवस्तू ठरणार गुन्हा
By admin | Published: January 19, 2015 4:31 AM