शिर्डी/कोल्हापूर : शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्तांच्या व श्री साईबाबा संस्थानच्या वतीने एकूण २ कोटी ५१ लाख रुपयांचा मदत निधी देणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. तर कोल्हापूर पोलिसांच्या वतीने 30 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
देशवासियांच्या संवेदनाचा आदर श्री साईबाबा संस्थान करीत आहे. त्या संवेदना व्यक्त करुन या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्तांच्या व श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मदत देण्यासंदर्भात मी संस्थानच्या सर्व विश्वस्तांची चर्चा केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयास व शासनाच्या परवानगीस अधिन राहून सदरचा निधी देण्यात येईल, असे डॉ. हावरे यांनी सांगितले.
पुलवामामध्ये 40 हून अधिक सीआरपीएफच्या जवानांना दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी पाकिस्ताने झेंडे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी ही मागणी जोर धरू लागली आहे.
अमिताभ बच्चनही धावले मदतीला...बॉलिवूडचा शहेशशहा अमिताभ बच्चन यांनीही शहीद कुटुंबीयांना मदत जाहीर केली असून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतच्या मदतीचे ट्विट करताना अमिताभ यांनी शहीदांचा आकडा 49 वर जरी गेला असला तरीही मी तो 50 एवढाच धरत आहे. यामुळे ही मदत 2.5 कोटी एवढी करत आहे, असे म्हटले आहे.