- प्रमोद आहेरशिर्डी (जि. अहमदनगर) : साई संस्थानच्या बँकांतील ठेवींच्या आलेखाबरोबरच दानात आलेल्या नाण्यांचा बँकेकडील साठाही वाढतो आहे. नाण्यांच्या समस्येने शिर्डीतील सर्वच राष्ट्रीयीकृत बँका मेटाकुटीला आल्या आहेत. चार बँकांनी नाण्यांच्या धास्तीने संस्थानच्या ठेवीच्या मोहावरही पाणी सोडले आहे. यामुळे संस्थान लवकरच अन्य बँकांमध्ये खाते उघडणार आहे. काही बँकांचा संस्थानकडे यासाठी प्रस्ताव आला आहे.
शिर्डीतील डझनभर व नाशिकच्या एका राष्ट्रीयीकृत बँकेत संस्थानचे खाते आहे. यात २६०० कोटींच्या ठेवी आहेत. साई संस्थान आठवड्यातून दोनदा देणगीची मोजदाद करते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बँकेला निमंत्रित करण्यात येते. दानातील नोटा व नाणी मोजून बँक घेऊन जाते. या रकमा बचत व ठेवीच्या रूपांत ठेवण्यात येतात.
प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड-दोन कोटींची नाणी साचल्याने जागा अपुरी पडत आहे. नाणी बँकेत पडून असतात; मात्र त्यावर संस्थानला तसेच रक्कम बँकेत रोखीने ठेवल्याबद्दल आरबीआयला व्याज द्यावे लागते. नाण्यांवर प्रत्येक बँकेला वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येतो. नाण्यांसाठी कापडी पिशव्यांचा खर्चसुद्धा बँकांनाच करावा लागतो. आता तर संस्थानने पैसे मोजणी मशीनही बँकांकडूनच देणगीरूपात मागितल्याचे कळते. बँकेकडील अतिरिक्त नाणी आरबीआयने स्वीकारली तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
वर्षाला साडेतीन कोटींची नाणी आठवड्यातून दोनवेळा नाण्यांची मोजदाद होते. दोन्हीची मिळून आठवड्याला ७ लाख रुपयांची नाणी जमा होतात. त्यानुसार एक वर्षाला साधारपणे ३ कोटी ६४ लाख रुपये रुपये जमा होतात.
तीन ट्रक नाणीछत्रपती कॉम्प्लेक्समध्ये कॅनरा बँक पहिल्या मजल्यावर आहे. छतापर्यंत भरलेल्या त्यांच्या स्ट्राँगरूममध्ये किमान तीन ट्रक नाणी असतील. त्यामुळे खालील दुकानदारांना छत कोसळण्याची भीती मांडतात. बँकांमधील नाण्यांची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - राहुल जाधव, सीईओ, साई संस्थान