शिर्डी - पाण्याइतकं काहीच अमुल्य नसल्याचं वास्तव दुष्काळाने समोर आलं आहे. साईनगरीत तर या दुष्काळात पाण्याला थेट देवत्व आलंय. मंदीरात मुर्ती समोर पाण्याचे जार ठेवुन शिर्डीतील कुलपबंद केलेल्या पाण्याचं मोल देवत्वापेक्षा अधिक असल्याचे द्योतक आहे़.
शिर्डी सध्या भिषण पाणी टंचाईला तोंड देत आहे़. संस्थानने पन्नास टक्के भक्तनिवास, प्रसादालयाचे दोन उपविभाग पाण्या अभावी बंद केलेत़ पैसे देवुनही संस्थानला गोडे पाणी उपलब्ध होत नाही. फिल्टर असुनही खारे पाणी तोंडातही धरणे अवघड आहे़. भाविकांनाही मिनरल वॉटरचेच पाणी घ्यावे लागत आहे़. शहरातही दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे़. संस्थानचे तलावही कोरडे पडले आहेत़ भोजनगृहात पत्रावळीवर जेवण देण्यात येत आहे़.
संस्थानला टँकर द्वारे पुरवठा होत असलेले बहुतांश पाणी खारे आहे़. त्यामुळे कर्मचारीही ते पाणी पित नाहीत़. संस्थानच्या नवीन भक्तनिवास (पाचशे रूम) व संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील सुरक्षा रक्षक रोज वर्गणी करून ड्युटीवर पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घेत आहेत. पण हे जार बाहेर ठेवले तर कुणीही किंवा वर्गणी न देणाराही पिऊन लगेच संपवत आहेत. यावर या सुरक्षा रक्षकांनी तोडगा शोधुन काढला आहे़. संस्थानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ सरस्वतीचे मंदीर आहे़. सुरक्षा रक्षकांनी या मंदीरात पाण्याचे जार ठेवुन त्याला कुलूप लावुन घेतलेले आहे़. यामुळे मुर्ती झाकुन गेली असुन भक्तनिवास समोर असलेल्या या मंदीरात मुर्तीच्या जागी पाण्याच्या जारचे दर्शन घडत आहे. एकुनच धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणीही पाण्याला देवापेक्षा अधिक दर्जा आला आहे तर अन्य ठिकाणी काय परिस्थीती असेल याची कल्पना न केलेली बरी.