Chipi Airport : २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चिपी परूळे विमावतळ प्रवाशांच्या सेवेसेसाठी सज्ज झालं आहे. कोंकणवासीयांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे, परंतु या विमानतळासाठी मोठ्या व्यक्तींच्या नावाचा आग्रह न धरता चिपी विमानतळ (Chipi Airport)असं का संबोधण्यात येतं हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. त्यामुळे या नावामागे काय रंजक इतिहास आहे, तेदेखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.
या विमानतळाचा उल्लेख 'चिपी परूळे' असा करण्यात येणार आहे. यामागचं कारण म्हणजे हे विमानतळ परूळे गावातील चिपी वाडी या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. चिपी हा परुळे गावाचाच एक भाग असून यापूर्वी ते पूर्वी एक पठार होते. आता याच ठिकाणी हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. या विमातळावर आता आंतरराष्ट्रीय विमानंही उतरणार आहेत. राजकारणापलीकडे विचार केल्यास हे विमानतळ कोकणच्या विकासाला गती देणारे ठरणार आहे. ते अशासाठी की पर्यटन वृद्धीसह आंबा, काजू आणि मत्स्योत्पादनाला थेट जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.
बांधकाम कोणी केलं?'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' (९५ वर्षे) या तत्त्वावर सिंधुदुर्ग विमानतळाच्या उभारणीसाठी एमआयडीसीने २००९ साली निविदा काढली. आय.आर.बी. सिंधुदुर्ग एअरपोर्ट कंपनीने ती जिंकली. २०१२ साली पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर चिपी विमानतळाचे काम पूर्ण करण्यात आले. कोरोनामुळे उद्घाटन रखडले. मार्च २०२१ मध्ये डीजीसीएच्या पथकाने धावपट्टीबाबत आक्षेप घेतल्याने आणखी विलंब झाला. धावपट्टीची दुरुस्ती केल्यानंतर आता चिपी विमानतळ विमान प्रचलनासाठी सज्ज झाले.
आकारमान
- २७५ हेक्टर व्याप्ती
- २५०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद धावपट्टी
- एअरबस ए-३२० आणि बोईंग ७७७ प्रकारातील विमाने उतरू शकतात
- १० हजार चौरस फुट टर्मिनल बिल्डिंग
- एकावेळी २०० प्रवाशांचे आगमन आणि २०० प्रवाशांचे निर्गमन हाताळण्याची क्षमता
- तीन विमाने पार्क करण्याची सोय. दुसऱ्या टप्प्यात ती १५ पर्यंत वाढविली जाणार.
- नाईट लँडिंग आणि इंधन भरण्यासाठी व्यवस्था