ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22 - देव, देश,धर्मकार्याकरिता सज्जनशक्ती निर्माण व्हावी व हिंदू संस्कृतीतून वर्तमान प्रश्नांवर युगानुकूल समाधान समोर यावे, यासाठी आयोजित धर्मसंस्कृती महाकुंभाचा शुक्रवारी शंखनाद होणार आहे. नेपाळपासून रामेश्वरमपर्यंतचे १ हजार ११८ संत-महंत या निमित्ताने नागपुरात येणार आहेत. या धर्मसंस्कृीत महाकुंभाच्या निमित्ताने पुरोगामी मुद्यांवरदेखील मंथन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संत-साधू व भारतीय सैन्यदल यांच्यातील समन्वयवाढ करण्यासाठी आयोजित प्रेरणासंगम तसेच देशातील मातांमध्ये राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी आयोजित मातृसंसद या महाकुंभाची विशेषता राहणार आहे.तीन दिवस चालणाऱ्या या महाकुंभात राष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या साधू-संतांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महंतांचादेखील समावेश आहे. हिंदू समाजाच्या वैदिक परंपरा व संप्रदाय परंपरेचे साधू सहभागी होतील. शिवाय विश्व मांगल्य सभेत देशभरातील साध्वींचेदेखील आगमन होणार आहे. या त्रिदिवसीय महाकुंभात भारतातील शेकडो महापुरुष आणि श्रीक्षेत्राहून आलेल्या चरण पादुका तथा प्रासादिक धर्मचिन्हे, समस्त जगद्गुरू शंकराचार्य, विविध संप्रदायांचे जगद्गुरू, आचार्य, महामंडलेश्वर, सांप्रदायिक संत यांच्या समवेत समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहतील. भारतीयांची वैश्विक दृष्टी, नाते जपण्याची कला, नात्यांमधील मधुर भावसंबंध, व्रतवैकल्यातील पर्यावरणपूरक विचार आणि युगानुकूल समाधान यावर या महाकुंभात विचार होईल.सरसंघचालक होणार सहभागी२५ डिसेंबर रोजी महाकुंभात आलेले संत-महंत यांच्या उपस्थितीत देशाला विश्वगुरुपदी नेण्यासाठी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. विराट धर्मसभेचे अध्यक्ष शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज राहणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रमुख मार्गदर्शन होईल. या धर्मसभेनंतर देशभरातून आलेल्या विविध उत्सवमूर्ती, प्रासादिक धर्मचिन्हे, पालख्या, दिंड्या आदींसह विराट नगरभ्रमण परिक्रमा निघेल.सैन्य-साधू यांच्यातील समन्वय वाढविणारसाधू व सैन्य यांच्यात समन्वय वाढावा यावरदेखील या महाकुंभात भर राहणार आहे. देशाच्या सीमाक्षेत्रात अनेक साधू-संत तपस्या करतात. या साधूंचा व सैन्यदलाचा समन्वय वाढीस लागावा तसेच सैन्याची मानसिक ऊर्जा वाढीस लागावी यासंदर्भात येथे मंथन होणार आहे. साधूंना सैन्यदलाशी जोडण्याच्या या प्रयत्नाअंतर्गत भारतीय सैन्यदलाचे सेवानिवृत्त अधिकारीदेखील धर्मसंस्कृती महाकुंभात सहभागी होणार आहेत. देशात सर्वदूर कुठेही राहाणारा सैनिक, पूर्व सैनिक, शहीद जवान यांच्या कुटुंबीयांना संत आणि समाजाचा भक्कम आधार मिळावा यासाठी प्रेरणासंगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संघभूमीत संत-महंतांची मांदियाळी
By admin | Published: December 22, 2016 10:59 PM