पुणे : एकाच व्यासपीठावर हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन नामवंतांची ‘त्रिवेणी’ उपस्थिती... त्यांच्यामधील ‘भाईचाऱ्या’चे घडलेले दर्शन... एकमेकांच्या धर्माविषयीचा नितांत आदर... आणि त्या माध्यमातून दिला गेलेला सर्वधर्मसमभावाचा संदेश... अशा काहीशा भारावलेल्या वातावरणात ‘ईश्वराचे पे्रषित महंमद पैगंबर यांच्या जीवनाचे अंतरंग’ उपस्थितांसमोर उलगडले. घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर, जमात- ए -इस्लामिक हिंद पुणेच्या वतीने ‘ईश्वराचे पे्रषित महंमद पैगंबर यांचे जीवन’ (पीस बी अपॉन हिम) या विषयावर आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेदाचार्य मोरेश्वर घैसास, बिशप थॉमस डाबरे, हाजी गुलाम मोहंमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन मुन्वर पीरभॉय, जमात-ए-इस्लामी हिंद, दावाह सेलचे सेक्रेटरी इम्तियाझ शेख आणि इस्लामिक सेंटरचे सचिव शेख करीमुद्दिन, शोएब शेख, मुस्तफी शेख हे उपस्थित होते. हे केवळ प्रदर्शन नाही तर महंमद पैगंबरांचे दर्शन आहे, असे सांगून विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘भाईचारा, सलोखा आवश्यक असण्याच्या कालखंडात हे प्रदर्शन आयोजित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. महंमद पैगंबर यांचे विचार, शिकवण आणि जीवनाची सूत्रे तसेच हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन या धर्मांच्या तत्त्वज्ञानाचे सार प्रदर्शनात अनुभवायला मिळते. महंमद पैगंबर यांनी सामाजिक विचार घेऊनच समाजाच्या प्रगतीची मांडणी केली आहे.’’मोरेश्वर घैसास यांनी, पृथ्वीवर सृष्टी निर्माण झाली आणि जे महामानव निर्माण झाले, त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठीचे विचार दिले. महंमद पैगंबर यांचेही विचार समाजासमोर यायला हवेत. धर्मगुरूंनी दिलेले विचार धर्मग्रंथ किंवा पोथ्या-पुराणांत अडकून ठेवता कामा नये, ते सर्व स्तरापर्यंत गेले तर समाजाचाच फायदा होणार आहे, असे सांगून महंमद पैगंबर यांची माहिती इंग्रजीबरोबर हिंदीमध्येही देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. हे प्रदर्शन अतिशय उद्बोधक आणि प्रबोधनात्मक आहे, असे सांगून थॉमस डाबरे म्हणाले, ‘‘मुस्लिम समाजात प्रेम, बंधुता नांदते. सर्व धर्मांच्या लोकांनी एकत्र राहिले पाहिजे. आपण सर्व ‘भारतीय’ असून, ही सर्व भूमी भारतीयांची आहे. असे असतानाही धर्माच्या नावाने तेढ माजविण्याचा प्रयत्न केला जातो, ही दुर्दैवी बाब आहे. महंमद पैगंबरांनीही ‘देव’ एकच आहे हे मानले; त्यामुळे ऐक्य आणि एकात्मता कशी वाढीस लागेल, हे पाहणे गरजेचे आहे.’’ मुन्वर पीरभॉय म्हणाले, ‘‘या प्रदर्शनात महंमद पैगंबर यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उलगडण्यात आला आहे. ज्यांना पैगंबरांविषयी माहिती नाही, त्यांच्यासाठी हे प्रदर्शन निश्चितच ज्ञानात भर टाकेल.’’ एजाज सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. >प्रदर्शनात महंमद पैगंबर यांची बायोग्राफी, वॉरियर, रिफॉर्मर, बिझनेसमन न्यायाधीश, मार्गदर्शक अशा भूमिकांमधून त्यांनी केलेले मार्गदर्शन, इस्लाम, इस्लाम धर्मात महिलांना असलेले स्थान, पर्यावरण आणि पाण्याचे महत्त्व या विषयांसंदर्भात त्यांनी दिलेली शिकवण या गोष्टी पोस्टरच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. ही पोस्टर स्वरूपातील माहिती लवकरच पुस्तिकेच्या स्वरूपात उपलब्ध करण्याचा मानस या वेळी व्यक्त करण्यात आला.
सर्वधर्मसमभाव अन् भाईचाऱ्याचे घडले दर्शन
By admin | Published: May 21, 2016 12:51 AM