नागपूर : देशातील सर्वांत मोठे क्रीडासंकुल नागपुरात आकाराला येणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) १४० एकर जागेत येत्या ५ वर्षांत संकुल बनेल. त्यासाठी २५० ते ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अद्ययावत क्रीडा सुविधा असलेले हे संकुल पश्चिम विभागाचे मुख्य केंद्र असेल, असे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सर्वानंद सोनोवाल यांनी शनिवारी येथे सांगितले.पूर्व भागातील मौजा वाठोडा येथे नागपूर महापालिकेने ‘साई’ केंद्रासाठी १४० एकर जमीन एक रुपया नाममात्र दराने ३० वर्षांसाठी लीजवर दिली आहे. या जागेच्या हस्तांतर सोहळ्यात सोनोवाल यांनी प्रस्तावित संकुलाबाबत माहिती दिली. या वेळी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक लोकप्रितिनिधी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यांतील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.नव्या संकुलातून भावी पिढीतील टॅलेंटेड खेळाडू निर्माण होतील, अशी आशा व्यक्त करून सोनोवाल म्हणाले, ‘‘पश्चिम भारताचे हे प्रमुख साई केंद्र म्हणून पुढे येईल. या ठिकाणी राष्ट्रीय तसेच आशियाई स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय संघांची शिबिरेदेखील नागपुरात आयोजित होतील. भारतात प्रतिभेची उणीव नसून केवळ उत्कृष्ट सुविधांअभावी हे टॅलेंट पुढे येत नाही. खेळामुळे मन आणि शरीराचा विकास होत असल्याने व्यक्तिविकासातून समाजविकास साधता येतो. या संकल्पनेतून भारताला जगात क्रीडाविकसित राज्य बनविण्याकडे वाटचाल करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.’’गडकरी यांच्या प्रयत्नांनी हे संकुल लवकरात लवकर आकाराला येईल, असा विश्वास सोनोवाल यांनी व्यक्त केला. ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’ योजनेत ११० खेळाडूंची निवड करण्यात आल्याचे सांगून सोनोवाल यांनी रिओ आॅलिम्पिकसाठी आतापर्यंत ७२ खेळाडू पात्र ठरल्याची माहिती दिली.