Maulana Sajjad Nomani on Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी व्होट जिहादचा मुद्दाही चांगलाच चर्चेत राहिला. प्रचारादरम्यान याला हवा मिळाली ती मौलाना सज्जाद नोमानी यांच्या एका व्हिडीओमुळे! याच व्हिडीओवरून भाजपने महाविकास आघाडीला लक्ष्य केले. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नोमानी यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल खुलासा दिला आहे.
ऑल इंडिया एकता फोरमचे अध्यक्ष, इस्लामचे प्रचार मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भूमिका स्पष्ट केली. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याच्या विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. माझे विधान कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हते वा कोणत्याही प्रकारचा फतवा नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.
मी बिनशर्त माफी मागतो -सज्जाद नोमानी
खलीलूर रहमान सज्जाद नोमानी नदवी यांचे एक पत्र समोर आले आहे. त्या पत्रात त्यांनी चर्चेत असलेल्या विधानाबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.
"मी ते विधान वेगळ्या संदर्भाने केले होते"
"भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याबद्दल जे माझे विधान सध्या चर्चेत आहे; एका विशेष संदर्भाने अनेक लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले गेले होते. हे ते लोक होते, ज्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या मुलभूत अधिकारापासून रोखले गेले होते. माझी प्रतिक्रिया त्या लोकांसाठी होती, जे भारताच्या सर्वसामान्य नागरिकांना संविधानिक अधिकारापासून रोखत होते", असे सज्जाद नोमानी यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणतात, "त्यामुळे त्या संदर्भाशिवाय माझ्या वक्तव्याकडे बघणे चुकीचे होईल. माझे विधान महाराष्ट्र निवडणूक २०२४ च्या खूप आधी सप्टेंबर २०२४ मधील आहे. माझे विधान कोणत्याही समाजाविरोधात अजिबात नव्हते. माझा तसा कोणताही उद्देश नव्हता, ना कोणत्याही प्रकारचा फतवा होता", असा खुलासा सज्जाद नोमानी यांनी केला आहे.
मी बिनशर्त माफी मागतो - सज्जाद नोमानी
सज्जाद नोमानी यांनी शब्द मागे घेत माफीही मागितली आहे. ते पत्रात म्हणाले, "तरीही जर माझ्या या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो आणि बिनशर्त माफी मागतो. मी नेहमी सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करत आलोय आणि मी नेहमी त्या व्यक्तीला विरोध केला आहे, ज्याने सर्वसामान्य माणसांना त्रास दिला आहे. मग तो मुसलमान असो वा अन्य कुणी", अशी भूमिका सज्जाद नोमानी यांनी मांडली आहे.
सज्जाद नोमानी यांचे विधान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रचंड वादग्रस्त ठरले होते. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाका. भाजपला मतदान करू नका. महाविकास आघाडीला साथ द्या, असे ते म्हणाले होते.