नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ आॅगस्ट रोजी विविध कार्यक्रमांसाठी नागपुरात येत आहेत. या दौऱ्यात ते सेमिनरी हिल्सवरील ‘राजभवन’मध्ये दुपारचे भोजन घेणार आहेत. यासाठी ५० ते ६० जणांचा कुकिंग स्टाफ सज्ज असून पंतप्रधान कार्यालयाकडून ‘मेनू’ची यादी येण्याची प्रतीक्षा आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी राजभवनात जोरात साफसफाई सुरू आहे. सुरक्षेचा आढावाही घेतला जात आहे. पंतप्रधानांच्या भोजनाची विशेष काळजी घेतली जात आहे. कॅटरिंग आॅफिसरच्या नियंत्रणाखाली १० हेड कूक, १० असिस्टंट कूक व कर्मचाऱ्यांचा स्टाफ नियोजन करीत आहे. राजभवनातील कॅटरिंग आॅफिसरने पंतप्रधान कार्यालयातील हेड कूकशी समन्वय साधला असून ‘मेनू’ची यादी मागविली आहे. ही यादी १८ ते १९ तारखेला मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय नागपूर विदर्भात प्रसिद्ध असलेले पक्वान्न व खाद्यपदार्थांची यादीही त्यांना पाठविली जाईल. यात शक्यतो यात नागपुरी संत्रा व झुणका भाकरचा समावेश असेल. पंतप्रधानांना काही वेळ विसावा घेण्यासाठी मुख्य इमारतीमधील मास्टर बेडरूम सज्ज करण्यात आली आहे. याच खोलीच्या शेजारी असलेल्या छोट्या डायनिंग रूममध्ये ते भोजन घेतील. मात्र, त्यांच्यासोबत तीनपेक्षा जास्त मान्यवर असले तर मात्र भोजन व्यवस्था शेजारच्या मोठ्या डायनिंग हॉलमध्ये केली जाईल. पंतप्रधान मोदी यांनी ऐनवेळी मुक्काम केला तर सकाळच्या व्यायामासाठी वॉकरही मागविण्यात आला आहे. मुख्य बंगल्याच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या बंगल्यात राज्यपालांची निवास व्यवस्था असेल. पंतप्रधानांसोबत सुमारे ७० ते ८० अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा राजभावनात दाखल होईल. या सर्वांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. रोज गार्डनमधील फुलांची सजावटराजभवन परिसरात मोठे ‘रोज गार्डन’ आहे. येथे बंगळुरू येथून आणलेली विविध जातींच्या गुलाबांची झाडे आहेत. सध्या या गार्डनमध्ये रंगीबेरंगी गुलाब फुलले आहेत. पंतप्रधानांच्या खोलीतील फुलदाणीत येथील गुलाब लावले जातील. या गुलाबांनीच खोलीची सजावट केली जाईल.
पंतप्रधानांसाठी सजतेय राजभवन
By admin | Published: August 14, 2014 1:26 AM