कोल्हापूर : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला आज बुधवारी भरपावसात कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सुरुवात झाली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या आंदोलनाला आता निर्णायक सुरुवात झालेली आहे. काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात येतं आहे.मराठा समाजातील एक प्रकारची ही क्रांतीच आहे अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आज कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मराठा समन्वय समितीचे कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आले असून ते मूक आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. शाहू छत्रपती, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह कोल्हापुरातील सर्व आमदार या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असून आपली मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे आणि पुढच्या काळामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला सहभाग राहील अशी ग्वाही त्यांनी येथे दिली आहे.
भरपावसात आरक्षणासाठी लढा
मराठा समाजाचे हे मूक आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येपासून मंगळवारी कोल्हापुरात पावसाला सुरुवात झाली. बुधवारची सकाळ सुद्धा पावसाने झाली. मूक आंदोलन सुरू होत असताना पावसाचा जोर अधिकच वाढला भरपावसामध्ये मराठा समाजाचे समन्वयक, नेते, समाजबांधव-भगिनी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
राजघराणे सहभागी
कोल्हापूरच्या राजघराण्यातील सर्वच सदस्य या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे यांचाही या आंदोलनात सहभाग आहे.