कोल्हापूर : पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने आक्रमक लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून गुरुवारपासून मुंबई, पुण्याला जाणारा दूधपुरवठा रोखण्यात येणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार समाजाने केला आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील आणि सचिन तोडकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.मुंबई, पुण्याला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून होणारा दूधपुरवठा रोखण्याचे आंदोलन गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून केले जाईल. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारात हे आंदोलन केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजावर अन्याय केला आहे. त्याचे उत्तर मराठा समाजाच्या वतीने आक्रमकपणे दिले जाईल. या स्थगितीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा आणि नोकरभरतीबाबत प्रश्न निर्माण झाला असून, त्यावर तोडगा काढण्याचा बुधवारपर्यंतचा अल्टिमेटम आम्ही महामार्ग रोको आंदोलनावेळी दिला होता. त्याबाबत सरकारकडून काहीच झाले नाही. त्यामुळे गुरुवारपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला.मराठा नेत्यांना पोलीसांकडून नोटीसापुणे : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने संतप्त मराठा आंदोलकांकडून मंत्र्यांच्या भेटी व दौऱ्यांवरील काळे झेंडे दाखवून गाड्या अडविण्याची शक्यता असल्याचा इशारा राज्य गुप्तचर विभागाने दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या घराजवळील पोलीस ठाण्यांमधून नोटीसा बजावण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. मराठा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, मंत्र्यांच्या दौºयाच्या वेळी वरिष्ठ अधिकाºयांच्या देखरेखीखाली पुरेसा बंदोबस्त लावण्यात यावा तसेच योग्य उपाय योजना करुन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
सकल मराठा समाज दूधपुरवठा रोखणार; आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 1:25 AM