- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : १९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा दशकांचा कालखंड पूर्ण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ, त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते, दलित साहित्य आणि या साहित्याचा झालेला विकास ही या देशातील ऐतिहासिक घटना आहे. हा इतिहास समाज, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अवगत व्हावा, यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मय कोष’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. डॉ. महेंद्र भवरे यांनी या प्रकल्पाचे काम हाती घेतले असून, पुढील तीन वर्षांमध्ये तो पूर्णत्वाला नेण्याचा मानस आहे.शाहू-आंबेडकरी साहित्याने समाजामध्ये प्रगल्भता निर्माण करण्याचे काम केले. या साहित्यातून तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचे चित्रण पाहायला मिळते. साहित्याचा हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि अभ्यासकांना हा ठेवा उपयुक्त ठरावा, निर्माण करणे, हे लक्षात घेऊन फुले-आंबेडकरी वाङ्मय कोष निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे.या कोषात आंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तिन्ही कालखंडातील लेखक, त्यांचे साहित्यातील योगदान आणि साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख आणि मुख्य संपादक डॉ. महेंद्र भवरे यांनी दिली.या प्रकल्पासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली असून यात माजी कुलगुरू आणि भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ विचारवंतडॉ. रावसाहेब कसबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस, लेखक अर्जुन डांगळे, समीक्षकडॉ. मनोहर जाधव यांचा समावेश आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, डॉ. भवरे यांच्यासह राम दुतोंडे, डॉ. शामल गरूड, डॉ. सुनील अवचार, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, डॉ. अशोक इंगळे, डॉ. प्रकाश मोगले, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे,डॉ. अशोक नारनवरे, डॉ. सतीश वाघमारे, डॉ. सुनील चंदनशिवे आदींचा या प्रकल्पात समावेश आहे.फुले-आंबडेकरी लेखक, साहित्यिक, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते यांनी या प्रकल्पासाठी माहिती पाठवावी, असे आवाहन भवरे यांनी केले आहे. या माहितीमध्ये लेखकाची शैक्षणिक वाटचाल, व्यवसाय, प्रकाशित पुस्तके, पुस्तकाचे प्रकाशन वर्ष, प्राप्त झालेले पुरस्कार, परीक्षण आणि समीक्षा आदी माहिती अपेक्षित आहे.
साकारतोय फुले-आंबेडकरी साहित्याचा वाङ्मय कोष, डॉ. महेंद्र भवरे यांच्यासह १२ जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 3:50 AM