लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड- १९च्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले. विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे तसेच त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शाळा, केंद्र आणि तालुका अशा विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठीत केली जाणार आहे.
कोरोनामुळे पालकांच्या स्थलांतर आणि वाढते बालविवाह यामुळे शाळाबाह्य विद्यार्थी वाढण्याची भीती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर घर, शाळा आणि समाजात सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तमरीत्या व्हावे, यासाठी शालेय शिक्षण विभागाने सखी सावित्री समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ च्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या समित्या स्थापन करण्यात येणार आहे.
शाळा समिती आणि केंद्र समितीची महिन्यातून एकवेळा तर तालुका समितीची बैठक तीन महिन्यांतून एकवेळा घ्यावी लागणार आहे. या बैठकांमध्ये शाळा समितीने केंद्र समितीला तर केंद्र समितीने तालुका समितीला अहवाल सादर करावा लागेल. शाळा समितीवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, केंद्र समितीवर केंद्रप्रमुख तर तालुका समितीवर गट शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.काय असेल जबाबदारीआपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के मुला-मुलींची उपस्थिती साध्य करण्यासाठी नावनोंदणी करणे, विद्यार्थ्याचे समुपदेशन करणे अशी कार्ये या समित्यांना नेमून दिली आहेत. याशिवाय शासकीय योजनांची माहिती देणे, करिअरसंबंधी मार्गदर्शन, बालविवाहांबाबत जनजागृती , सीएसआरच्या माध्यमातून दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे ही जबाबदारी या समित्यांकडे आहे.