नीलेश बुधावले, पुणेदिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्नांची वेगळी दुनिया पडद्यावर मांडतो. चित्रपटगृहात त्यांच्या या स्वप्नांना प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचे खऱ्या अर्थाने काम करतो तो चित्रपटगृहातील प्रोजेक्शनिस्ट. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील पी. ए. सलाम गेली ४० वर्षे मनस्वी आनंदाने या स्वप्नांच्या आणि वास्तववादी दुनियेची सफर प्रेक्षकांना घडवून आणणारे सलाम आज निवृत्त होत आहेत. मूळचे केरळचे असलेले सलाम १९७३ मध्ये पुण्यात आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी पावणेदोन रुपये पगारावर खासगी कं पनीत काम केले. काही काळ काम केल्यावर त्यांनी ती नोकरी सोडली. वेगवेगळ््या ठिकाणी काम करताना त्यांचा पगार अडीच रुपये, चार रुपये असा वाढत होता. २२ नोव्हेंबर १९७६ला २१० रुपये पगारावर त्यांना राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात फिल्म चेकरची नोकरी मिळाली. गेली ३६ वर्षे चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमातील चित्रपट आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संग्रहालयात होणाऱ्या सर्व महोत्सवांतील चित्रपट तेच दाखवतात. प्रोजेक्टरवर फिल्म दाखवणे हे त्यांचे आवडते काम झाले आहे. आज ते निवृत्त होत आहेत. मल्याळम मातृभाषा असलेले सलाम चाळीसहुन अधिक वर्षे पुण्यात राहत असल्याने मराठी चांगल्या रितीने बोलतात. शिवाय इंग्रजी व हिंदीवर ही चांगला प्रभाव असल्याचे त्यांच्या वाणीतून दिसुन येते.प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम करावे लागण्यामागील त्यांचा किस्साही गंमतीदार आहे. ते सांगतात, केरळ येथे रसग्रहण अभ्यासक्रमातील फिल्म सांभाळण्यासाठी १९७९ मध्ये तत्कालीन संचालक पी. के. नायर यांच्यासह गेलो होतो. तेथील चित्रपटगृहात एकदा प्रोजेक्शनिस्ट आला नाही. त्यामुळे मोठी गडबड झाली. तेथे असणारे दिग्दर्शक अडुर गोपालकृष्ण यांनी मला फिल्म प्रोजेक्टरवर कशी चालवायची हे शिकवले. त्या वेळी मी ते काम विश्वासाने केले व त्यानंतर मला त्या कामात रस वाटू लागला. पुढे संग्रहालयातील फिल्म दाखवण्याची संधी मला मिळाली. सध्या डिजिटल तंत्रज्ञान वापरले जाते. मात्र सलाम यांनी वेगवेगळ््या काळातील तंत्रज्ञानानुसार स्वत:ला अपडेट ठेवले. सुरुवातीला कार्बन रॉड, त्यानंतर झेनॉन लॅम्पवर फिल्म दाखवली जायची. मग व्हिडीओ कॅसेट्वर प्रोजेक्टर चालवले जाऊ लागले. आता डीव्हीडीवर फिल्म दाखवावी लागते. सेल्युलॉइड फिल्मचे रिळ प्रोजेक्टरमध्ये अडकवून फिल्म दाखवण्यातील गंमत डिजिटल माध्यमात नाही. चित्राची सुस्पष्टता ही सेल्युलॉइडवरच अधिक होती. डिजिटल माध्यमाची स्वत:ची अशी बलस्थाने असली, तरी सेल्युलॉइड फिल्मचा आनंद काही औरच होता, असे ते मनमोकळेपणाने सांगतात. गेली वीस वर्षे सलामचं आणि माझं जिवा-भावाचं नातं आहे. राष्ट्रीय फिल्म संग्रहालयातील थेटरपासून प्रोजेक्शनच्या खोलीपर्यंतचे पावित्र्य जपण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. वरुन फणसासारखा दिसणारा सलाम आतून खूपच मृदू आणि मवाळ आहे. - उमेश कुलकर्णी, दिग्दर्शकभारतीय चित्रपटसृष्टीचा एक अविभाज्य भाग म्हणून सलाम यांच्याकडे पाहता येईल कारण चाळीस वर्षांच्या सेवेत त्यांनी हजारो दुर्मिळ चित्रपटांचं संकलन आणि संरक्षण करण्याचं काम केलं आहे. - प्रकाश मगदुम, निदेशक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय
स्वप्नांची सैर घडविणारे करणार ‘सलाम’
By admin | Published: May 31, 2016 1:59 AM