मुंबई : मालवणी दारूकांडानंतर शहरातील आणि शहराबाहेरील गावठी दारूच्या भट्ट्यांपासून गुत्त्यांपर्यंत सर्व नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. पण ही बंदी क्षणिक ठरली. मुंबईत आजही गावठी दारूचा नेमक्या गुत्त्यांवर पुरवठा होत असल्याचे भांडुप पोलिसांनी गावठी दारूविक्रीप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत उघड झाले. या प्रकरणात शनिवारी आणखी एका आरोपीस भांडुप पोलिसांनी अटक केली. भांडुप एलबीएस मार्गावर सोमवारी गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या इंडिका कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मुंबईत गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती समोर आली. भांडुप पोलिसांनी चालक मोगम पल्ली स्वामीला अटक केली. घटनास्थळाहून पळून गेलेल्या गणेश मुलानी स्वामीला शनिवारी वडाळा येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप शेट्टी अजूनही पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. स्वामी आणि शेट्टी दोघेही गेल्या चार महिन्यांपासून गोरेगाव येथील गेट क्रमांक १, २ आणि ३ परिसरात याची विक्री करत होते. तेथील गुत्त्यांवर सररासपणे या गावठी दारूची विक्री केली जात होती. तेथूनच ही दारू मालवणी परिसरातही विकली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. भिवंडीच्या अंजूर गावातून ही दारू आणत असल्याची कबुली स्वामीने दिली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली. गेल्या वर्षी घडलेल्या मालवणी दारूकांडात १०३ जणांचा मृत्यूू झाला होता. तपासात मालवणीतल्या गुत्त्यांवर भट्टीवर गाळलेली दारू नसून इथेनॉल विकले जात होते, अशी माहिती पुढे आली होती. त्यामुळे भांडुप पोलिसांनीही स्वामीच्या गाडीत मिळालेल्या गावठी दारूचा नमुना न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत धाडला आहे. (प्रतिनिधी)
मालवणीत होतेय गावठी दारूची विक्री
By admin | Published: May 16, 2016 4:35 AM