समीर कर्णुक,
मुंबई-गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा राज्यासह मुंबईतदेखील पाण्याची मोठी समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. याचाच फायदा सध्या पाणीमाफिया घेताना दिसत आहेत. मानखुर्दमध्ये पालिकेच्या पाण्याची चोरी करून हे माफिया रहिवाशांना सररास पाणी विकत आहेत. २० लीटर पाण्यासाठी ३५ ते ७५ रुपये हे माफिया घेत असल्याने रहिवाशांना दिवसाला पाण्यासाठी १५० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हा पाणीप्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. शहरातील विविध प्रकल्पांमध्ये बाधित असलेल्या झोपडीधारकांचे शासनाने मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंड परिसरात पुनर्वसन केले आहे. या ठिकाणी म्हाडा आणि एमएमआरडीएच्या ६०पेक्षा अधिक इमारती आहेत. एमएमआरडीएने आणि म्हाडाने या ठिकाणी या प्रकल्पग्रस्तांचे केवळ पुनर्वसन केले; मात्र त्यांना लागणाऱ्या सुविधांकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसभरात केवळ १० मिनिटे पाणी येत असल्याने रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. याचाच फायदा पाणीमाफिया घेत आहेत.एकीकडे रहिवाशांची तहान भागत नसली तरी पाणीमाफियांना मात्र या परिसरात हवे तेवढे पाणी उपलब्ध आहे. येथील चिकूवाडी परिसरात पालिकेची पाइपलाइन फोडून काही पाणीमाफिया पाण्याची चोरी करत आहेत. त्यानंतर याच पाण्याची ते रहिवाशांना थेट घरपोच विक्री करत आहेत. लल्लूभाई कम्पाउंडमध्ये सहा ते सात मजल्याच्या इमारती आहेत. लिफ्ट नसल्याने इतक्या वर पाणी घेऊन जाणे रहिवाशांना शक्य नाही. त्यामुळे पाणीमाफिया या रहिवाशांना घरपोच पाणी पोहोचवत आहेत. प्रत्येक मजल्यासाठी ते १० रुपये वाढवून घेत आहेत. पहिल्या मजल्यावर २० लीटर पाण्यासाठी ३५ रुपये तर दुसऱ्या मजल्यासाठी ४५ रुपये असा या माफियांचा पाण्याचा भाव आहे. घरात पाणीच येत नसल्याने जेवण आणि इतर कामांसाठी रहिवासी २० ते ४० लीटर पाणी रोज विकत घेतात. यासाठी त्यांना रोज शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागत आहेत. अनेकांची दिवसाची कमाई शंभर रुपयेही नसताना त्यांना कमावलेले पूर्ण पैसे पाण्यासाठी खर्च करण्याची वेळ आली आहे. रहिवाशांनी पाण्याच्या या समस्येबाबत पालिका, एमएमआरडीए, म्हाडा आणि येथील स्थानिक नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्यांच्याकडून नेहमीच कानाडोळा होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.