पुणे: राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाच्या दृष्टीने कापसाच्या बियाण्याचे नियोजन केले असून राज्यातील शेतक-यांसाठी २ कोटी २० लाख कापसाच्या बियाण्यांची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या १५ मे पर्यंत सर्व जिल्ह्यात बियाणे पाठविली जातील. त्यानंतर सर्व अधिकृत कृषी केंद्रांवरून येत्या 1 जूनपासून कापसाच्या बियाण्याच्या विक्रीला सुरूवात केली जाईल,असे राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयातील अधिका-यांनी सांगितले.राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तब्बल ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कृषी विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. प्रतिबंधित करण्यात आलेले एसटीबीटी बियाणे बाजारात विक्री करणा-यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील वर्षी राज्यातील विविध भागात बनावट बियाण्यांची विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाने ३० गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे एसटीबीटी बियाण्याच्या विक्रीला चांगलाच लगाम बसला आहे.कृषी विभागाचे मुख्य निरिक्षक (गुणवत्ता नियंत्रण) चंद्रकांत गोरड म्हणाले,कापसावर पडणा-या शेंदरी बोंड आळीमुळे २०१७-१८ मध्ये तब्बल १० लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिक बाधित झाले होते. त्यामुळे अनेक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, मागील वर्षी कृषी विभाग आणि बियाणे उत्पादक कंपन्यांनी संयुक्तपणे काम करून शेंदरी बोंड आळीमुळे होणारे कापूस पिकाचे नुकसान आटोक्यात आणले आहे. त्यातच शेतक-यांच्या कापसाला प्रति क्विंटल ६ हजार ३०० रुपये दर मिळाला.त्यामुळे यंदा कापूस पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिका-यांकडून व्यक्त केली जात आहे.गोरड म्हणाले, राज्यात कापूस पिकाचे सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागातर्फे मागील वर्षी शेतक-यांसाठी २ कोटी २० लाख कापसाच्या बियाण्यांची पाकिटे उपलब्ध करून देण्यात आली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे मागील वर्षी केवळ १ कोटी ६० लाख बियाण्यांच्या पाकिटांची विक्री झाली.केंद्र शासनाने कापसाच्या ४५० ग्रॅमच्या पाकिटाची किंमत सुमारे ७३० रुपये निश्चित केली आहे.
राज्यात कापूस बियाणे विक्रीला १ जूनपासून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 11:00 PM
राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तब्बल ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते.
ठळक मुद्देकृषी विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीबाबत विशेष काळजीमागील वर्षी राज्यातील विविध भागात बनावट बियाण्यांची विक्री प्रकरणी ३० गुन्हे दाखलशेंदरी बोंड आळीमुळे २०१७-१८ मध्ये तब्बल १० लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिक बाधित