मुंबई: कुख्यात अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक छोटा शकिलचा साडू गँगस्टर सलीम फ्रूट उर्फ सलीम इब्राहिम कुरेशीला (४०) मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्याला ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. माहिम परिसरातील एका डॉक्टरला २००४ मध्ये आफताब आलम उर्फ विकीने फहिम मचमच आणि सलीमच्या इशाऱ्यावरून २५ लाखांची खंडणी मागितली होती. मात्र, तडजोडीनंतर १० लाख रुपये देण्याचे ठरले. डॉक्टरने माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात पाच लाखांचा पहिला हफ्ता स्वीकारताना दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून सलीम फ्रूट उर्फ सलीम इब्राहिम कुरेशीचे नाव समोर आले. २००७ मध्ये सलीमला दुबईहून मुंबईत आणले. त्यानंतर अन्य एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला सलीम २०१० मध्ये जामिनावर बाहेर आला. दरम्यान, २००४ च्या खंडणीच्या गुन्ह्यांत सलीम फ्रूटवालाच असल्याबाबत संशय असल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली नव्हती. गुन्हे शाखेने सुरू केलेल्या आरोपींच्या ड्राइव्हमध्ये त्यांची ओळख पटली. त्यानुसार, मंगळवारी सलीमला अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)
सलीम फ्रूटला अटक
By admin | Published: March 03, 2016 4:33 AM