मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. भेटीनंतर सलमान खानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याची बातमी समोर आली. पण, आता संघर्ष नावाच्या एका संघटनेने याप्रकरणी मुंबई पोलिसांना पत्र लिहिले आहे. या पत्रात संघटनेने सलमान खानला शस्त्र परवाना न देण्याची मागणी केली आहे.
पत्रात काय म्हटले?पत्रात म्हटले आहे की, सलमान खानचा यापूर्वी गुन्हेगारी रेकॉर्ड राहिला आहे. हिट अँड रन प्रकरणापासून ते पत्रकाराशी केलेल्या गैरवर्तनाच्या घटनेचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे या पत्राद्वारे सलमानला बंदुकीचा परवाना न देण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, विश्नोई गँगकडून धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सलमानने मुंबई पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे.
सलमानचा पोलिसांकडे अर्जसलमान खानने शुक्रवारी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, पोलीस आयुक्त हे आपले जुने मित्र असून आपण त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो, असे सलमान खानने सांगितले.
बिश्नोई गँगकडून धमकीगेल्या महिन्यात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे बोलले जात आहे. यामुळेच सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शस्त्र परवाना देण्याची मागणी केल्याची बातमी मीडियातून प्रसिद्ध झाली.