ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - हिट अँड रनप्रकरणी उच्च न्यायालयाने जरी सलमान खानची मुक्तता केली असली तरी हे प्रकरण अद्याप संपलेले नसून या खटल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. त्यामुळे लवकरच सर्वोच्च न्यायालयात सलमानविरोधात खटला उभा राहणार असून, त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅकवर टाकण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
२८ सप्टेंबर २००२ साली वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळ सलमान खानच्या लँड क्रूजर गाडीने फूटपाथवर झोपलेल्या ५ जणांना चिरडले होते, त्यात एकाचा बळी गेला तर इतर काही जण जखमी झाले. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टात जामीन मिळवत सलमानने तुरुंगवारी वाचवली होती. त्यानंतर सबळ पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने १० डिसेंबर २०१५ रोजी त्याची सुटका केली होती.
मात्र महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारचा हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला असून आता सुप्रीम कोर्टात सलमानविरोधात खटला उभा राहणार आहे.
दरम्यान सलमानच्या गाडीची ठोकर बसून जखमी झालेल्या नियामत शेखनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. जखमींपैकीच एक असलेल्या शेखने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करत सलमानच्या सुटकेला आक्षेप नोंदवला. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ठोस पुराव्यांना नजरअंदाज करत हायकोर्टाने सलमानला चुकीच्या पद्धतीने दोषमुक्त केल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला.
आणखी वाचा