ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - ' सलमानला जर पाकिस्तानी कलाकारांबद्दल इतकं प्रेम वाटत असेल तर त्याने तिथलं वर्क परमिट काढावं आणि पाकिस्तानात जाऊन तिथेच काम करावं. इथे आपले जवान शहीद होत आहेत आणि या लोकांना गाणी शूट करायची आहेत' अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी सलमानवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी सलमानवर टीकास्त्र सोडले.
- ' कलाकार आभाळातून पडतात का ? ज्या कलाकारांना स्वत:च्या देशासाठी उभं राहता येत नाही, त्या कलाकारांना पाकिस्तानात तरी किंमत मिळेल का? पाकिस्तानची लोक चांगली असतात तर मग चाटायचं का?' असा सवालही राज यांनी विचारला.
सलमानला पाकिस्तानी कलाकारांबद्दल एवढं प्रेम वाटतं ना? मग देशाबद्दल प्रेम का वाटत नाही? देशासाठी लढताना जे जवान शहीद झाले त्यांच्याबद्दल कोणीच काही का बोलत नाही? श्रद्धांजली का वाहिली नाही, असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. उद्या याच जवानांनी शस्त्र खाली ठेवली तर सलमान सीमेवर लढायला जाणारे का? असा खडा सवाल त्यांनी विचारला.
आम्ही पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी आणली म्हणून हे लो गळा काढतात. मग आपल्याकडे आज प्रदर्शित झालेल्याधोनीच्या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घातली जाते, त्याबद्दल कोणी आवाज का उठवत नाही? असेही राज म्हणाले.
पाकिस्तानी कलाकार खबरे नसतील कशावरून?
सलमान खान म्हणतो पाकिस्तानी कलाकार म्हणजे दहशतवादी नाहीत. पण मग ते कलाकार माहिती पुरवत नसतील, ते खबरी नसतील कशावरून, असा सवालही त्यांनी विचारला. जोपर्यंत त्यांच्यावर बहिष्कार टाकणार नाही तोपर्यंत पाकिस्तान सुधारणार नाही अशी भूमिका राज यांनी मांडली.