औरंगाबाद : वादग्रस्त वक्तव्याबाबत अभिनेता सलमान खान याला राज्य महिला आयोगाने नोटीस बजावली असून, बुधवारी दुपारी २ वाजता आयोगाच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिली. ‘सुल्तान’ या चित्रपटात सलमान कुस्तीपटूची भूमिका करीत आहे. या चित्रपटात त्याने पहिलवानांना उचलून फेकल्याचे अनेक प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. ही भूमिका करताना कसे वाटले, असा प्रश्न सलमान खानला एका पत्रकार परिषदेत विचारला गेला. त्यावर सलमानने ‘हा अनुभव माझ्यासाठी फारच भयानक होता. एका बलात्कारित महिलेला जसे वाटते, तसे मी याप्रसंगात अनुभवत होतो’, असे उत्तर दिले. सलमानच्या या उत्तरामुळे वाद निर्माण झालेला आहे. अनेक महिला संघटनांनी, पक्षांनी सलमानचा निषेध केला आहे.याबाबत औरंगाबादेत विजया रहाटकर यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, सलमानचे हे वाक्य अत्यंत हीन आहे. त्याच्या या बोलण्याचा चाहत्यांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. या विधानाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या विधानाचे स्पष्टीकरण देण्यासाठी सलमानला नोटीस बजावण्यात आली आहे. आपले स्पष्टीकरण सलमानने २९ जून रोजी आयोगासमोर मांडले नाही तर तो या विधानाशी सहमत आहे, असे समजून त्याच्याविरुद्ध आयोग त्याच्यावर पुढील कारवाई करील, असे रहाटकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढविजया रहाटकर यांनी महिला अत्याचाराबाबत आढावा बैठकही घेतली. तसेच तक्रारीही जाणून घेतल्या. त्यानंतर त्या म्हणाल्या, ग्रामीण व शहरी भागात महिलांच्या बाबतीतील गुन्हे वाढत चालले आहेत. कौटुंबिक हिंसाचारामुळे महिलांनी केलेल्या आत्महत्या समाजमनाला अस्वस्थ करीत आहेत.सलमानविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणीनागपूर : महिलांसाठी लज्जास्पद ठरेल, असे कथित वक्तव्य करणारा अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध तक्रार देऊन पाच दिवस झाले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात धरणे दिले. सलमानविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.
सलमानला महिला आयोगाची नोटीस
By admin | Published: June 26, 2016 3:12 AM