मुंबई : दादर, शिवाजी पार्क येथील महापौरांचे शासकीय निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहबे ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. महापौरांच्या निवासस्थानाचा प्रश्न कायम असताना सनदी अधिकारी बदलीनंतरही महापालिकेच्या मलबार हिल येथील बंगल्यात वास्तव्यास आहेत. महापालिकेने वेळोवेळी नोटीस पाठवूनही सनदी अधिकारी प्रवीण व पल्लवी दराडे यांनी बंगला खाली केलेला नाही, अशी हतबलता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. यावर सुधार समिती सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर या गंभीर विषयावर सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार आहे.पालिकेच्या जल विभागाच्या अखत्यारीत असलेला हा बंगला डिसेंबर २०१४मध्ये अतिरिक्त पालिका आयुक्त पल्लवी दराडे यांना राहण्यास देण्यात आला. तेव्हापासून त्यांचे पती सनदी अधिकारी प्रवीण दराडे व त्या या बंगल्यात राहत आहेत. दादर, शिवाजी पार्क येथील महापौरांचे निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिले असल्याने महापौरांच्या निवासस्थानाचा शोध सुरू आहे. मात्र राणीबागेतील बंगला नाकारून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मलबार हिल येथील या बंगल्याची मागणी केली होती. हा बंगला महापालिकेचा असल्याने सनदी अधिकाºयाच्या बदलीनंतर त्याचा ताबा महापालिकेकडे परत येणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हा बंगला परत घेण्याची मागणी लावून धरली आहे. बदलीनंतरही सनदी अधिकाºयाला या बंगल्यात राहायला देऊन चुकीचा पायंडा पाडू नये, अशी सूचना सदस्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याने दराडे दाम्पत्याला हा बंगला वास्तव्यास मिळाल्याचा आरोप होत आहे.याबाबत शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी सुधार समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. या हरकतीच्या मुद्द्याला उत्तर देताना पालिकेने वेळोवेळी प्रवीण दराडे व पल्लवी दराडे यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये बंगला खाली करावा असे सांगण्यात आले. तरीही दराडे यांनी बंगला खाली केला नसल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने दाखवलेल्या या हतबलतेवर सुधार समिती सदस्यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. सामान्य नागरिकाने अतिक्रमण केल्यास पालिका फौजफाटा घेऊन संबंधितांवर कारवाई करते. मग पालिकेच्या जागेत सेवेत नसलेले सनदी अधिकारी बेकायदेशीररीत्या राहत असताना पालिका प्रशासन गप्प का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. यावर सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी ठोस कारवाईचा अहवाल सादर करावा असे आदेश प्रशासनाला दिले.
मलबार हिलचा बंगला दराडे दाम्पत्य सोडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 2:25 AM