पुणे : आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या, सामान्य ते असामान्य प्रवास करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सखी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. या सेवाव्रतींच्या कार्यातून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आणि सशक्तीकरण, सबलीकरणाचा मार्ग खुला करण्यासाठी त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. शनिवारी नगर रस्त्यावरील हयात रिजेन्सी येथे हा शानदार पुरस्कार सोहळा रंगला. सीमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत आणि ‘लोकमत’तर्फे आयोजित सखी सन्मान पुरस्कार सोहळ््यात नीता पारख (औद्योगिक), नन्सी कट्याल (शैक्षणिक), रुपा खन्ना (सामाजिक), मंजुषा पाटील (सांस्कृतिक), सोनाली तोडकर (क्रीडा), डॉ. पद्मा अय्यर (आरोग्य) आदि सखींना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रीती मोदी यांना ‘लोकमत व्हिजन’ पुरस्कार, नेहा कांदळगावकर आणि पिनल वानखेडे यांना ‘लोकमत कॅलिबर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सीमा शांताराम जाधव ट्रस्टचे संस्थापक शांताराम जाधव, ढोले पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या उपाध्यक्षा उमा ढोले-पाटीलम रेंज रोव्हरचे मार्केटिंग मॅनेजर विवेक वराळे, छाजेड असोसिएटसच्या सपना छाजेड उपस्थित होत्या. ‘लोकमत’चे संपादक विजय बावीस्कर यांनी सर्वांचे स्वागत केले.सखी सन्मान पुरस्कारांच्या माध्यमातून महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कार्याचा गौरव करणारे व्यासपीठ निर्माण व्हावे आणि सखींच्या कर्तृत्वाला सलाम करता यावा, हा ‘लोकमत’चा उद्देश आहे. पुरस्कार सोहळ््याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ‘व्हजायना मोनोलॉग’ हे नाटक हिंदीतून सादर करण्यात आले. हे नाटक इव्ह एन्स्लर यांनी लिहिले असून डॉली ठाकूर, प्रियांका सेठिया, स्वाती दास आणि महाबानो मोदी-कोतवाल यांनी नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. (प्रतिनिधी)
पुण्यात ‘सखीं’च्या कर्तृत्वाला सलाम!
By admin | Published: November 13, 2016 2:40 AM