उपराजधानीत ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूची शिल्पकृती’: नागपूरकरांनी अनुभवला ऐतिहासिक सोहळानागपूर : ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता तसेच वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून रोज सकाळी जगभराची खबरबात वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचकांच्या घरी पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या त्यागाला व कष्टाला सलाम करणारे शिल्प मंगळवारी प्रत्यक्षात साकारले अन् राज्यभरातून आलेल्या शेकडो वृत्तपत्र विक्रेते बांधवांना गहिवरून आले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने उपराजधानीतील ऐतिहासिक संविधान चौकात साकारण्यात आलेल्या शिल्पकृतीचे लोकार्पण ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्याच्याच हस्ते व्हावे आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री, मान्यवर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी साक्षीदार राहतात हे पाहून विक्रेते बांधव सद््गतीत झाले आणि त्यांनी हा अपूर्व क्षण आपल्या आयुष्यात अविस्मरणीय असाच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.नागपूरच्या इतिहासात क्रांतिस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संविधान चौकात सायंकाळी शिल्पकृतीचे लोकार्पण झाले तेव्हा काही क्षणासाठी गजबजलेल्या या चौकात रोमांच उभे राहिले होते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून संविधान चौकात झालेल्या लोकार्पण समारंभाला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. वृत्तपत्र विक्रेत्याचे महत्त्व आणि त्याचे कार्य याचा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी केला. रोज सकाळी वर्तमानपत्राच्या माध्यमातून देश-विदेशातील बातम्या वाचकांपर्यंत पोहोचविणाऱ्या विक्रेत्यांच्या कामाची ओळख ही या शिल्पकृतीच्या माध्यमातून होत राहील, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्र विक्रेता आणि त्याच्या कष्टाला सलाम करणाऱ्या शिल्पकृतीचे महत्त्व स्पष्ट केले. त्याचप्रमाणे लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा म्हणाले की, ‘लोकमत’ फक्त बातम्याच देत नाही तर त्यापलीकडे जाऊन या क्षेत्राशी जुळलेल्या घटकांसाठी उपक्रम राबविते. वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत वृत्तपत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांएवढाच विक्रेत्यांचा सुद्धा वाटा मोठा आहे. त्यांच्या कल्याणाचा विचार म्हणूनच हा उपक्रम राबविण्यात आला आहे. एकूणच ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीे’चा लोकार्पण सोहळा नागपूरसाठी ऐतिहासिक ठरला.या सोहळ्याला आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, सुधाकर कोहळे, अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, माजी मंत्री अनिस अहमद, विभागीय आयुक्त अनुप कुमार, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) निर्मला देवी, स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, भाजपचे जेष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस अतुल कोटेचा, दीपक देवसिंघानी संजय चोरडिया, उद्योजक दिलीप छाजेड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रणजितसिंग बघेल, डॉ. पिनाक दंदे, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, प्रतिष्ठित नागरिक सुरेंद्र लोढा, प्रा. रामभाऊ मदने यांच्यासह शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंनी व्यक्त केली कृतज्ञता‘लोकमत’ने आमच्यावरील बांधिलकीतून शिल्पकृती उभारली. विशेष म्हणजे त्याचे लोकार्पण आमच्याच एका ज्येष्ठ बांधवाच्या हस्ते झाले ही आमच्यासाठी लाख मोलाची बाब आहे, या शब्दात कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या शेकडो वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंनी लोकमतबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनी केली ‘लोकमत’ची प्रशंसावृत्तपत्र कर्मचारी, विक्रेते यांच्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘लोकमत’ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाची बाजू मांडताना ‘लोकमत’ने कधीच कुणाची पर्वा केली नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आजच्या कार्यक्रमाची नोंद ऐतिहासिक घटना म्हणून केली जाईल, असे गौरवोद््गार त्यांनी काढले. ‘स्टॅच्यू आॅफ फ्रीडम आॅफ प्रेस’ला भेटया लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र व गोवा येथून आलेल्या शेकडो वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी ‘लोकमत’च्या बुटीबोरी येथील अद्ययावत मुद्रण प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी जगातील पहिल्या ‘स्टॅच्यू आॅफ फ्रीडम आॅफ प्रेस’लादेखील भेट दिली.नागरिकांमध्ये दिसली उत्सुकतासंविधान चौकात उभारण्यात आलेल्या वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांच्या शिल्पकृतीबाबत उपराजधानीतील नागरिकांमध्ये उत्सुकता होतीच. मंगळवारी याचे लोकार्पण झाल्यानंतर या शिल्पकृतीला पाहण्यासाठी येथे गर्दी जमली होती. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनीदेखील गाड्या पार्क करून या शिल्पकृतीला पाहण्यासाठी धाव घेतली. थोड्या वेळासाठी संविधान चौकात नागरिकांची गर्दी एकवटली होती व सर्वांकडून कौतुकोद्गार काढण्यात येत होते.
कष्टाला सलाम, त्यागाचा गौरव
By admin | Published: January 07, 2015 1:05 AM