निकेत कौशिक, अतिरिक्त पोलिस महासंचालक- १९९५ बॅचचे आयपीएस ऑफिसर असलेले निकेत कौशिक यांनी मुंबईसह राज्यभरात महत्त्वाच्या पदावर महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. राज्य दहशतवाद विरोधी विभागात आयसिस मॉड्युल विरोधात त्यांनी अनेक धडाकेबाज कामगिरी केली. मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखेसह रेल्वे पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी पदभार सांभाळला आहे. या कारकिर्दीत अनेक हायप्रोफाइल प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. सध्या राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलिस महासंचालक म्हणून ते कार्यरत आहेत.
मधुकर पांडेय, पोलिस आयुक्त, वसई विरार- मधुकर पांडेय १९९६च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असलेल्या पांडेय यांनी चंद्रपूरमधून अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून पोलिस सेवेला सुरुवात. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गडचिरोली. पोलिस उपायुक्त म्हणून ठाणे व नागपूर शहर. अतिरिक्त पोलिस आयुक्त मुंबई शहर. सहपोलिस आयुक्त नवी मुंबई, ठाणे व मुंबई वाहतूक. मुंबई रेल्वेचे पोलिस आयुक्त. उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्र व राज्य सरकारसह अनेक पदक, पुरस्कारप्राप्त. २०११ च्या वर्ल्ड कप अंतिम क्रिकेट सामन्यावेळी वानखेडे स्टेडियमची सुरक्षा व्यवस्था यशस्वीपणे सांभाळली.
दिलीप सावंत, विशेष पोलिस महानिरीक्षक- पोलिस सेवेत ३६ वर्षे कार्यरत असलेले आयपीएस दिलीप सावंत हे सध्या राज्याची सागरी सुरक्षा सांभाळत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे. . त्यांच्या कारकिर्दीत जास्तीत जास्त ‘मोक्का’च्या केसेस नोंद होत, त्यांनी १८ गँगचा गाशा गुंडाळला. फिल्म सिटीमध्ये कंत्राट मिळविण्यासाठी कुरघोडी करणाऱ्या गँगचाही त्यात समावेश होता. तसेच थायलंडच्या तुरुंगात असलेला दाऊदचा हस्तक गँगस्टर मुन्ना मुज्जफीर मुदस्सर उर्फ मुन्ना झिंगाडाला भारतात आणून अटकेची कारवाई करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
सत्यनारायण चौधरी, सहपोलिस आयुक्त - मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले आयपीएस सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वपूर्ण संवेदनशील हायप्रोफाइल प्रकरण हाताळले आहे. संध्या सिंह, प्रीती राठी या हत्या प्रकरणांचा त्यात समावेश आहे. वसई, नांदेड, बुलढाणा येथे कामाचा ठसा उमटवल्यानंतर चौधरी यांनी मुंबई पोलीस व गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्त, अपर पोलिस आयुक्त म्हणून अनेक हायप्रोफाइल गुन्ह्यांचा छडा लावला. बराक ओबामा यांच्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली.
मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे - ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. कड यांची १९९२ मध्ये उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. १९९३ ते २००३ दरम्यान ते अतिसंवेदनशील लकडगंज पोलिस स्टेशन, नागपूर आणि खंडणीविरोधी पथकात होते. नागपूर शहरात असताना कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांनी कुशलतेने हाताळली होती. खून, खंडणी, घरफोडी, फसवणुकीसारख्या गुन्ह्यांमधील अनेक आरोपींना त्यांनी जेरबंद केले होते.
शारदा राऊत,पोलिस उपमहानिरीक्षक - भारतीय पोलिस सेवेच्या २००५ च्या बॅचच्या शारदा राऊत या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी आहेत. नागपूर आणि पालघर येथे त्यांनी पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून त्या सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत. सध्या पोलिस सेवेतील त्यांचे पद पोलिस उपमहानिरीक्षक आहे. तसेच, सध्या सीबीआयमध्ये त्या बँकिंग घोटाळा तपास विभागाच्या मुख्याधिकारी आहेत. एक कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहूल चोक्सी याच्या प्रकरणाचा तपास त्यांनी केला आहे.
वीरेश प्रभू, वित्तीय गुन्हे तपास प्रमुख (सीबीआय)- भारतीय पोलिस सेवेच्या २००५च्या बॅचचे वीरेश प्रभू हे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांनी सोलापूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आले. तसेच मुंबईतदेखील वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त, दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. गुन्हे शाखेतही त्यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर गेले. सध्या ते वित्तीय गुन्ह्यांच्या तपास विभागाचे प्रमुख आहेत. गेल्या काही वर्षांत कॉर्पोरेट कंपन्यांकडून झालेल्या गुंतागुंतीच्या आर्थिक घोटाळ्यांचा तपास त्यांनी केला आहे.
रश्मी करंदीकर, पोलिस उपायुक्त, नागरी संरक्षण- पोलिस सेवेत १९ वर्षे आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या आयपीएस रश्मी करंदीकर यांनी राज्य महामार्ग येथे पोलिस अधीक्षक, ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त, मुंबई पोलिस दलात मुख्यालय १, अभियान, पोर्ट झोन, तसेच सायबर विभागाच्या उपायुक्त म्हणून सेवा बजावली. मुंबईत सायबर विभागाच्या उपायुक्त असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणे हाताळली. धुळे परिसरात एकाने ब्लेडने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचे फेसबुक लाइव्ह केले. ही बाब लक्षात येताच, सायबर पोलिसांनी तरुणाचे लोकेशन शोधून धुळे पोलिसांच्या मदतीने त्याचे प्राण वाचवले होते.