छत्रपती संभाजीनगर : चातुर्मासासाठी जैन आचार्य विरागसागर महाराज (६१) छत्रपती संभाजी नगरकडे येत असताना गुरुवार, ४ जुलै रोजी पहाटे २:३० वाजता त्यांचे सल्लेखनापूर्वक समाधीमरण झाले. जालन्याजवळील देवमूर्ती या गावातील पाटणी फार्म येथे त्यांच्या पार्थिवावर दुपारी विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. आचार्यश्रींना वंदन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो जैन बांधव पोहोचले होते.
आचार्य विरागसागर महाराज यांनी ९ डिसेंबर १९८३ रोजी छत्रपती संभाजीनगरात मुनीश्रीपदाची दीक्षा घेतली होती. त्यानंतर आचार्यश्रीजी व २१ साधू-संतांसोबत पहिल्यांदाच चातुर्मासासाठी छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. मध्य प्रदेशातील पन्ना येथून १६ मार्चला आचार्यश्री संघाची पदयात्रा निघाली होती. सलग १०८ दिवसांचा पायी प्रवास करून आचार्यश्रीसंघ सिंदखेडराजा गावात पोहोचले होते. गुरुवारी पहाटे १:३० वाजता झोपेतून उठून त्यांनी साधना केली. त्यानंतर साधूसंघाशी संवाद साधला आणि काही वेळातच त्यांचे समाधीमरण झाले.
आचार्य विरागसागर महाराज यांचे दीक्षापूर्वीचे नाव अरविंद कपूरचंद जैन असे होते. त्यांच्या आईचे नाव श्यामादेवी जैन होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील पथरिया या गावी २ मे १९६३ रोजी झाला. शहडोल येथील बुढार येथे तपस्वी सम्राट आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांनी २० फेब्रुवारी १९८० या दिवशी त्यांना क्षुल्लक दीक्षा दिली व त्यांचे नामकरण क्षुल्लक पूर्णसागरजी महाराज ठेवण्यात आले. मुनीश्री दीक्षेनंतर त्यांचे नामकरण मुनिश्री विरागसागरजी असे करण्यात आले. द्रोणगिरी येथे आचार्य विमलसागरजी महाराज यांनी ८ नोव्हेंबर १९९२ रोजी त्यांना आचार्यपद दिले.
आचार्यश्रींनी ३५० जैन साधूंना दीक्षा दिलीआचार्यपद मिळाल्यानंतर विरागसागर महाराज यांनी मागील ३२ वर्षांत ३५० जैन साधूंना दीक्षा दिली. आज हे साधूसंत २४ तीर्थंकरांनी दाखविलेल्या मार्गावर जीवन प्रवास करीत आहेत. जनसामान्यांपर्यंत ‘अहिंसा परमो धर्म’चे ज्ञान पोहोचवीत आहेत.
जैन मंदिरात होणार होता चातुर्मासआचार्य विरागसागर महाराज २१ साधूसंतांसोबत आगामी चातुर्मासासाठी छत्रपती संभाजीनगरात येत होते. येथील अरिहंतनगर जैन मंदिरात त्यांचा चातुर्मास होणार होता. त्याचे संपूर्ण नियोजन व तयारी मंदिर विश्वस्तांनी केली होती.