मुंबई - इथले लोक आम्हाला मते देत नाहीत. तुम्हीच लोक आहात जे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला जिंकवता. माझ्यासोबत राहा, कुणी माई का लाल मुंबईत तुमच्या केसांना धक्का लावू शकत नाही. उत्तर भारतीयांच्या नादाला लागू नका, जोपर्यंत प्रेमाने वागतात तोपर्यंत ठीक अन्यथा उचलून बत्तीशी बाहेर काढू असा इशारा देत समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.
समाजवादी पक्षाच्या नवनियुक्त ३६ खासदारांचा मुंबईत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अबु आझमींनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यावर भाष्य केले. अबु आझमी म्हणाले की, जेव्हा उत्तर भारतीयांवर अन्याय होतो तेव्हा कोण उभा राहतो? आम्हाला सरकार सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना देते. मी तर केवळ लाठी मागितली होती. मारू नका पण मारही खावू नका असं म्हटलं. तेव्हा माझ्यावर गुन्हे दाखल झाले. तो बोलला तलवार वाटू पण मर्दांसमोर तलवारीचं महत्त्व काय, ही काठी गांधींची आहे जी भल्याभल्यांना ठीक करते असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय आता निवडणुका होणार आहेत. माझा टॅम्पो हाय आहे, यंदा जबरदस्त निवडणूक लढणार आहोत. समाजवादी पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवायचा आहे. माझ्यासोबत राहा, जेव्हा आमच्या लोकांवर हल्ला केला जातो. तेव्हा कुणी तुमच्या मदतीला आलं नाही. मी त्या व्यक्तीचं नाव घेऊन तोंड खराब करू इच्छित नाही. त्याने किती उत्तर भारतीयांना मारलं, दुकाने फोडली, हत्याही झाली मात्र तो कधी जेलला गेला का, एकदा मला गृहमंत्री बनवा, एकदा बनलो ना अनेकांना त्यांची नानी आठवेल असं सांगत आझमींनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.
दरम्यान, गेल्या २० वर्षापासून आम्ही २-४ आमदार निवडून आणतोय. परंतु आज माझ्या निमंत्रणावर समाजवादी पक्षाचे ३६ खासदार मुंबईत आले त्याचा अभिमान वाटतो. जेव्हा सायकलवरून जाणाऱ्या माझ्या उत्तर भारतीयांना मारहाण होते तेव्हा माझं काळीज तुटतं कारण मी यूपीतून आलोय. उत्तर प्रदेशात कामधंदा असता तर आम्ही इथं आलो असतो का? तर नाही. आमच्या यूपीतील लोकांनी मुंबईत इतकं काम केलं आहे की इतर कुणी करूच शकत नाही. गावात आमच्याकडे ३-४ खोल्यांचे घर आहे, मात्र याठिकाणी आमचा युवक येतो आणि अशा खोलीत राहतो जिथं गावी आम्ही बकऱ्या, कोंबड्याही पाळत नाही. जेव्हा मुंबईत अशा जागा होत्या जिथं कुत्रंही जात नव्हतं तिथे आमच्या पूर्वजांनी मातीतून सुंदर जागा तयार केली असंही अबु आझमी यांनी म्हटलं.
विशालगडाचा मुद्दा संसदेत उचला
आज विशालगड महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्याठिकाणी लोकांनी अनधिकृत घरे बांधलीय, तिथे दर्गाही आहे. अनधिकृत तर अनेक ठिकाणी आहेत. गरिबीमुळे अनधिकृत बांधकामे केली जातात. लोकांकडे राहण्याची जागा नाही. सरकारकडून काही मिळत नाही. ८० कोटी जनतेला रेशन दिले जाते, त्यांना रेशन दिले नाही तर ते मरतील. मग ते घरं कशी बांधणार? आज अनधिकृत घरे तोडली जातायेत. धार्मिक वाद निर्माण करतायेत. खरा हिंदू असं कधीही करणार नाही. काही विघातक लोक ती बांधकामे तोडायला गेली. अनधिकृत असेल प्रशासन , पोलीस, महापालिका कारवाई करेल तुम्ही कसे जाऊ शकता?. त्या लोकांनी मस्जिद पाडून टाकली. हा मुद्दा संसदेत उचला. हे देशात चालणार नाही अशी मागणी अबु आझमींनी सपा खासदारांकडे केली.
रामाच्या नावावर लोकांचा विश्वासघात
१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मुसलमानांना पाकिस्तानात जायची संधी होती. मात्र याठिकाणच्या मशिदी ओस पडतील, आपल्या पूर्वजांच्या कबरी इथं आहेत, त्यामुळे अनेक मुस्लीम इथेच थांबले. मात्र आज जे सरकार देशात आहे ते २४ तास मुस्लिमांच्या मागे लागले आहेत. जेव्हा निवडणूक होती तेव्हा मी अयोध्येची जागा निवडून यावी यासाठी मी नमाज केली. जेव्हा ही जागा जिंकली तेव्हा जगावर फतेह केला असं वाटलं. खूप रामाचं नाव घेता, राम तुमचे नाहीत तर आमचे आहेत. तुम्ही रामाच्या नावावर लोकांचा विश्वासघात करतात. आपण पूर्ण भारत जिंकू असं सांगत आझमींनी भाजपावर टीका केली.
उत्तर भारतीयांसाठी मी राजकारणात आलो
नेताजींनी मला शोधलं नाही तर मी नेताजींना शोधलं. महाराष्ट्रात जो अन्याय होत होता त्याविरोधात लढण्यासाठी कुठला पक्ष चांगला आहे याचा विचार मी करत होतो. मी राजकारणात नव्हतो. सर्व पक्ष मी पाहिले. तेव्हा उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव नावाचा व्यक्ती आहे. किती धाडसी माणूस होता, जेव्हा त्यांचे सरकार आले तेव्हा मुस्लीम छाती काढून चालतील कुणी माई का लाल माझं काही बिघडवणार नाही असं त्याला वाटतं. जेव्हा मी ऐकले तेव्हा मी मुलायम सिंह यांना भेटलो. तुमचा पक्ष महाराष्ट्रात का लढत नाही असं विचारलं तेव्हा माझ्याकडे कुणी मजबूत नेता नाही त्यामुळे मी महाराष्ट्रात पक्ष वाढवू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. तेव्हा मी मजबूत नाही, परंतु तुम्हाला मी महाराष्ट्रात बोलवणार, समाजवादी पक्षाचा झेंडा उचवणार हे माझं स्वप्न असल्याचं मी मुलायम सिंह यांना सांगितले. नेताजीचा करिश्मा खूप वेगळा होता असं आझमींनी सांगितले.
मी महाराष्ट्र सोडणार नाही
मुलायम सिंह आजारी असताना त्यांना भेटलो तेव्हा तु इथं ये २-४ आमदार काय सरकार चालव असं म्हटलं परंतु माझे उत्तर भारतीय महाराष्ट्रात आहेत मी त्यांच्यासाठी राजकारणात आलोय असं मी सांगितले. २८-३० वर्षापासून मी संघर्ष करतोय. मी मुलायम सिंह यादव यांचा शिपाई बनून काम करतोय. मी कुणाला साथ दिली तर मरेपर्यंत सोडत नाही. आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारधारेसाठी लढतोय. आज देशाची अवस्था बिकट आहे असंही आझमी म्हणाले.