गौरी टेंबकर-कलगुटकर,
मुंबई- नागरिकांचे रक्षण व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले समतानगरातील पोलीस गेल्या दोन दिवसांपासून कोंबडीचोराच्या शोधात आहेत. कांदिवली, समतानगर परिसरातील दोन दुकानांतून रविवारी रात्री सुमारे ४०० कोंबड्यांवर चोरट्याने डल्ला मारला आहे. एका दुकानाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याचे चौर्यकर्म चित्रित झाले आहे. त्याच्या मदतीने पोलीस तपास करीत आहेत. कांदिवली पूर्वच्या दामूनगर परिसरात अस्लम कुरेशी यांचे घाऊक कोंबडीविक्रीचे दुकान आहे. रविवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दहाच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. रात्री चोरट्याने शटरचे कुलूप तोडून १७७ कोंबड्या पळविल्या. कुरेशी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्याबाबत त्यांनी समतानगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी परिसरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, एक जण मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास टाटा ४२० या टॅम्पोत कोंबड्या भरून घेऊन गेल्याचे दिसून आले. त्याच रात्री असाच प्रकार समतानगरातील परिसरातील एका दुकानातून अशाच प्रकारे २०० कोंबड्यांची चोरी झाली. त्याबाबत दुकानचालक माणिकभाई यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. एकाच रात्रीत एका भागातील दोन दुकानांतून चोरी झाल्याने, पूर्ण पाळत ठेवून हा प्रकार केला गेला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.