कोल्हापूर - हसन मुश्रीफ मला काय बोलतील ते बोलू द्या. परंतु या देशाचे नेते शरद पवार एवढे वर्ष राजकारणात आहेत. विरोधी पक्षाचे किंवा कुठल्याही पक्षाने हे बोलण्याचं धाडस केले नाही जे हसन मुश्रीफांनी केली. मुश्रीफ यांनी शरद पवारांवर जातीवादाचा आरोप केला. ज्या व्यक्तीने तुम्हाला ही सर्व पदे दिली तेव्हा अल्पसंख्याक हा विषय नव्हता का?, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, पुरोगामी चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. शरद पवारांना तुम्ही जे बोलला त्याची जाहीर माफी मागितली पाहिजे असं मागणी करत समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.
घाटगे यांनी मंगळवारी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर मुश्रीफांनी अल्पसंख्याक असल्याने शरद पवारांकडून मला टार्गेट करण्यात येत आहे असं विधान केले होते. त्याचा समरजितसिंह घाटगेंनी समाचार घेतला. समरजितसिंह घाटगे म्हणाले की, संविधानात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मी हसन मुश्रीफांच्या विधानांना गांभीर्याने घेत नाही. कागलची जनता माझी पाठराखण करेल. याआधीही मुश्रीफांनी मला धमक्या दिल्यात. माझ्या पाठिशी शरद पवार असल्याने काळजी करण्याची आवश्यकता नाही असं सांगत त्यांनी मुश्रीफांवर पलटवार केला.
तसेच मुश्रीफांनी आज डायरेक्ट शरद पवारांना टार्गेट केले. शरद पवारांनी फक्त सभा घेतली त्याच चुकीचे काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला अधिकार दिला आहे. कागल ही माझी खासगी संपत्ती झालीय, मग इथं येऊन सभा घेण्याचं धाडस कसं करते असं मुश्रीफांना वाटतंय. शरद पवारांनी सभा घेतली, त्यांचे विचार मांडले. मात्र तुम्ही थेट पवारांवर आरोप करण्याचे धाडस करताय मी त्याचा निषेध करतो असं समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
दरम्यान, ईडीच्या आरोपावेळीही जातीचं कार्ड वापरले गेले. शरद पवारांवर तुम्ही जे आरोप करतायेत ते चुकीचे आहे. आज त्यांनी अल्पसंख्याकांचा उच्चार ४ वेळा केला. मुश्रीफांनी माझ्या पत्नीचा उल्लेख केला. माझ्या आईसाहेबांवर बोलले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आम्ही काम करतोय. विरोधी गटाच्या कुठल्याही महिलांवर आम्ही आरोप करणार ही आमची भूमिका आहे. माझ्यावर टीका करा पण कागलची बदनामी करू नका असा इशारा समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफांना दिला आहे.
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
शरद पवार माझे दैवत आहेत. शरद पवार साहेब माझ्या मागे का लागले आहेत, हे मला कळत नाही. ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागत आहेत?" असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला. तसेच, जयंत पाटील आले होते तेव्हा समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश झाला नाही. शरद पवार आले तेव्हा प्रवेश झाला. माझ्या सारख्या अल्पसंख्याक माणसाच्या मागे का लागता? ही निवडणूक नायक विरूद्ध खलनायक अशी असेल असं मुश्रीफांनी म्हटलं.