पुणे : पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात संतांचे आणि वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. हा वारसा पुढे नेत प्रतिगामी शक्तींवर मात करुन समाताधिष्ठित महाराष्ट्र घडवला पाहिजे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते दिंडी सोहळ््याचा प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बद्रिनाथमहाराज तनपुरे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, रिपार्इंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते आदि व्यासपीठावर उपस्थित होते. हे संमेलन दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना समर्पित करत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. विखे पाटील म्हणाले, ‘संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर संतांच्या विचारांची कास धरायला हवी. सध्याच्या दुष्काळाच्या समस्येतूनही वारकरी संप्रदायच मार्ग दाखवेल. सत्ताधारी हातात झाडू घेऊन प्रसिध्दीसाठी स्वच्छता अभियानाचा देखावा करीत आहेत. मात्र, स्वच्छतेचे मूल्य प्रस्थापित केलेल्या गाडगेमहाराजांचे नाव मात्र पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ’ बहुजन समाजाच्या उद्धारासाठी समतेचा, विश्वबंधुत्वाचा उद्घोष व्हावा, असे मत संमेलनाध्यक्ष बद्रिनाथमहाराज तनपुरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. सामाजिक प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद वारकरी संप्रदायामध्ये आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. (प्रतिनिधी)
समताधिष्ठित महाराष्ट्र घडावा - राधाकृष्ण विखे-पाटील
By admin | Published: May 22, 2016 4:13 AM