- लीनल गावडे, मुंबईगेलतॉ कोहॉ? चाललॉ कडँ? हे ऐकून थोडे बुचकळ्यात पडायला झाले असेल. परंतु मुंबईपासून ४० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वसई गावातील सामवेदी ब्राह्मणांची ही बोलीभाषा. नीट ऐकले तर या भाषेत प्रामुख्याने मराठी, कोकणी आणि गुजराती/मारवाडी भाषेचा झालेला मिलाप पाहायला मिळतो. इंग्रजी भाषेच्या वाढलेल्या अतिक्रमणामुळे मराठी भाषेप्रमाणे या बोलीभाषेचे अस्तित्वही धोक्यात आले होते. या भाषेचे महत्त्व ओळखत वसईकरांनी या भाषेच्या संवर्धनार्थ कंबर कसली आहे. नव्या पिढीने ही भाषा आत्मसात करावी यासाठी बोलीभाषेतील मौखिक साहित्याला लिखित साहित्यात रूपांतर करण्याचे काम समाजातील लेखक मोठ्या प्रमाणावर करत आहेत. आता नाताळच्या दिवसांत सारे ख्रिस्ती बांधव एकवटतात यानिमित्ताने सामवेदी/कादोडी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल वसईकरांनी उचलले आहे.१५व्या शतकात पोर्तुगीजांचे वसई, गोवा, दिव-दमण येथे राज्य होते. येथील सामवेदीब्राह्मणांचे धर्मपरिवर्तन ख्रिस्ती धर्मात करण्यात आले. सामवेदी ब्राह्मणांची ही भाषा असून, त्याला ‘सामवेदी भाषा’ म्हणतात. तर ख्रिस्ती बांधव या भाषेला ‘कादोडी’ असे संबोधतात. पोर्तुगीजांनी येथील नागरिकांचे धर्मपरिवर्तन केले तरी त्यांची मूळ भाषा मात्र तशीच राहिली. या भाषेला स्वतंत्र अशी लिपी नाही त्यामुळे सामवेदी साहित्य हे मौखिकच असल्याचे अभ्यासक सांगतात. इतर भाषांप्रमाणे सामवेदी भाषेत म्हणी, वाक्प्रचार, लोकगीते आहेत. परंतु ते मौखिक परंपरेने पुढे गेले. याचे लिखित साहित्य करायची इच्छा कदाचित लेखकांची झाली असेल. परंतु या साहित्याचे लिखित पुरावे फारच कमी असल्याचे अभ्यासक सांगतात. विशेष म्हणजे गेल्या दशकांमधील झालेल्या स्थित्यंतराचा परिणाम वसईतील या भाषेवरदेखील झाला. व्यवसाय वृद्धीसाठी आणि व्यवहारासाठी अन्य भाषा महत्त्वाच्या वाटू लागल्या. साहजिकच सामवेदीकडे येथील नव्या पिढीचे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे ५० ते ६० हजार इतक्या लोकसंख्येपुरती मर्यादित राहिलेली ही भाषा आणखीच लोप पावत गेली. मात्र बोलीभाषा टिकली पाहिजे, नव्या पिढीला कळली पाहिजे यासाठी आता या बोलीभाषेतील साहित्य तयार केले जात आहे. स्वतंत्र लिपी नसली तरी देवनागरी भाषेत याचे रूपांतर करण्यात येत आहे. त्यामुळे येथील लोकगीतांचे ध्वनिमुद्रण करण्यात आलेले आहे. म्हणींचे, वाक्प्रचारांचे बऱ्यापैकी साहित्य आता उपलब्ध आहे.वसईत एकूण ६ वेगवेगळे समाज आहेत. यात भंडारी, कोळी, सामवेदी, पालशे, आग्री आणि सर्वाधिक समाज वाडवळ समाजाचा आहे. या समाजातील अधिकाधिक लोकांचे ख्रिस्ती धर्मात रूपांतर झाले आहे.सामवेदी ब्राह्मणांचा विशेष पेहराव आहे. महिला लाल लुगडं, पुरुष लाल टोपी - पांढरे धोतर, काळे जॅकेट असा विशेष पेहराव करतात. ही संस्कृतीही कालपरत्वे मागे पडत असल्याचे अभ्यासक सांगतात. त्यामुळे या पारंपरिक वेषभूषेला पुन्हा नवी झळाळी आणण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे येथील स्थानिक सांगतात. भाषा, पेहरावासोबतच येथील खाद्य संस्कृतीही जपण्यासाठी नागरिकांनी पावले उचलली आहेत.बावतीस दाबरे आणि फादर कोरिया यांच्या सहकार्याने सध्या सामवेदी बोलीतील लोकगीतांचे, म्हणींचे आणि वाक्प्रचारांचे संशोधन केले जात आहे. ‘सामवेदी लोकगीते’, ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’ आदी पुस्तके संपादित करण्यात आली आहेत. यंदा नव्याने सामवेदी भाषेतील ‘कादोडी’ हा नाताळ विशेष अंक येत आहे. याशिवाय कुपारी कट्ट्याद्वारे भाषा टिकविण्यासाठीचा प्रयत्न केला जात आहे.काही सामवेदी म्हणीहालाडी लेकरू आन गावाला वॅडॉ - बाळ कडेवर आणि शोध गावभरज्याई बेटी त्याई मान हेटी - ज्याची बेटी, त्याची मान हेटीसांदाहारकॉ उंगवालॉ आन सूर्याहारकॉ मावळलॉ - चंद्रासारखा उगवला अन् सूर्यासारखा मावळलाउडलॉ, उडलॉ, खापरीत पडलॉ - उडला, उडला, खापरीत पडलाहुय लाईली आन पारय घेटली - सुई लावली अन् पहार घेतलीजागतिकीकरणामुळे बोलीभाषा मागे पडत गेल्या. परंतु आता लोकांना या बोलीभाषेचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळेच संस्कृती वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे. विशेषत: उत्तर वसईत सामवेदी भाषा संवर्धनाला वेग आला आहे. कारण भाषा राहिली तरच संस्कृती टिकेल हे लोकांना पटू लागले आहे. - सचिन मेंडस, सामवेदी भाषा संवर्धन कार्यकर्ते.
भाषेसाठी सामवेदी सरसावले
By admin | Published: December 25, 2016 4:17 AM