Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही एका महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाव मग तुझाशी बोलतो’, असे विधान केल्यानंतर राज्यभरातून याचा तीव्र निषेध केला जात आहे. सर्वसामान्य महिलांपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकांनी संभाजी भिडे यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच आता संभाजी भिडे यांना आता त्यांचे एकेकाळचे शिष्य असलेल्या नितीन चौघुलेंकडून जोरदार आव्हान दिले जाणार आहे. संभाजी भिडे यांच्या गडकोट मोहिमेला टक्कर देण्यासाठी नितीन चौघुले यांनी थेट पानिपत मोहीम आयोजित केल्याची माहिती देण्यात आली आहे.
या मोहिमेत प्रामुख्याने आग्रा, झाशी, जिंजी, अटक, पश्चिम बंगाल यासह अन्य स्थळांचा समावेश असल्याचे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितले आहे. मराठ्यांनी गाजवलेल्या एका स्थळाला भेट देऊन तेथून प्रेरणा घेण्यासाठी मोहीम काढण्यात येणार आहे, अशी माहिती चौघुले यांनी दिली.
मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर पानिपत मोहीम सुरू करणार
जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पानिपत मोहीम सुरू करण्यात येणार आहे. १४ जानेवारी २०२३ रोजी ही मोहिम सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तरुण पिढीला सांगण्यासाठी व दाखवण्यासाठी पानिपत मोहीमचे आयोजन केले गेले आहे. महाराष्ट्रातील अठरा पगड जातीमधील मराठ्यांच्या पराक्रमाच्या खुणा देशात अनेक ठिकाणी आहेत. एका दृष्टीने ती सर्व प्रेरणास्थाने आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्यावर चहुबांजूंनी टीका केली जात आहे. महिलेचे कर्तृत्व कुंकू लावण्याने सिद्ध होते का? तिचे काम व कुंकू याचा काय संबंध आहे? संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराचा केलेला अपमान हा समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. महिलेला तुच्छ लेखणाऱ्या अहंकारी पुरुषी मानसिकतेतून आलेला हा प्रकार असून भिडे ही समाजातली विकृत्ती आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"