Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यासंदर्भात एक विधान केले आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने राज्यभर निदर्शने केली. अमरावतीत गुन्हाही दाखल झाला आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर संभाजी भिडे यांनी आता देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासंदर्भात विधान केले आहे. या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांबाबत केलेले विधान वादात सापडले आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नाहीत. ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केले. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. यानंतर आता यवतमाळ येथे बोलताना संभाजी भिडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासंदर्भात विधान केले आहे.
हिंदुस्थानासाठी नखाएवढेही योगदान नाही
अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही. मात्र कोणतेही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले. नेहरूंनी चीनसोबत केलेला ‘पंचशील’ करार हिंदुस्थानाला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने भारताचा पराभव केला आणि इशान्येकडील भूभाग गिळंकृत केला. हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत, असे संभाजी भिडे म्हणाले. तसेच हिंदुंना युद्धशास्त्राची गरज आहे. त्यासाठी अद्ययावत लष्करी शाळाच काढणार असल्याचे संभाजी भिडे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, यवतमाळ विभागाच्या वतीने स्थानिक बलवंत मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानात संभाजी भिडे बोलत होते. संभाजी भिडे यांच्या यवतमाळ येथील व्याख्यानाला अनेक सामाजिक, पुरोगामी, आंबेडकरवारी संघटनांनी जोरदार विरोध केला. संभाजी भिडेंचे शहरात लागलेले बॅनर, पोस्टर फाडले. कार्यक्रमस्थळी अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. भिडेंच्या व्याख्यान परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.